हैडलाइन

तुर्भे येथील रेडी मिक्स काँक्रिट (आर. एम. सी.) प्रकल्पास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांची आकस्मिक भेट



 तुर्भे येथील रेडी मिक्स काँक्रिट (आर. एम. सी.) प्रकल्पास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांची आकस्मिक भेट

 प्रमाणित कार्यपद्धती (एस.ओ.पी.) नुसार कामकाज केले जात आहे किंवा कसे याची केली पडताळणी
 
प्रकल्‍पस्‍थळी गुणवत्ता हमी (ऍश्‍युरंस) साठी अभियंत्‍यांनी आग्रही भूमिका घेण्‍याचे  बांगर यांचे निर्देश
 
मुंबई शहर विभागात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची दुसऱया टप्प्यातील कामे प्रगतिपथावर आहेत. काही रस्‍ते कामांसाठी तुर्भे येथील रेडी मिक्स काँक्रिट (आर.एम. सी.) प्रकल्पातून मिश्रणाचा पुरवठा केला जातो. या प्रकल्‍पस्‍थळास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काल (दिनांक १ एप्रिल २०२५) रात्री आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. महानगरपालिकेने निश्चित केलेल्‍या प्रमाणित कार्यपद्धती (एस.ओ.पी.) नुसार आर. एम. सी. प्रकल्‍पाचे कामकाज सुरू असल्‍याचे पाहणीदरम्‍यान आढळले.

 बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्‍वास गेली पाहिजेत, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर हे मुंबई शहरासह पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरांमध्‍ये सुरू असलेल्‍या रस्‍ते कामांना प्रत्‍यक्ष भेट देत आहेत. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आय. आय. टी. मुंबई) चमू, गुणवत्‍ता देखरेख संस्‍थेचे (क्‍यू.एम.ए.) प्रतिनिधी यांच्‍याशी संवाद साधत आहेत.  या पाहणी दरम्‍यान, बांगर हे निरीक्षणांच्‍या आधारे संबंधितांना विविध निर्देश देत आहेत.

गुणवत्‍ता नियंत्रण (क्‍वालिटी कंट्रोल) समवेतच काँक्रिट कामाची गुणवत्‍ता हमी (क्‍वालिटी ऍश्‍युरंस) हा मुद्दादेखील महत्‍त्‍वपूर्ण आहे. महानगरपालिकेने निश्चित केलेल्‍या प्रमाणित कार्यपद्धती (एस.ओ.पी.) चे पालन करून काँक्रिट बनविले जात असेल आणि प्रमाणबद्ध काम होत असेल तर काँक्रिटची गुणवत्‍ता सर्वोच्‍च असते. केवळ कार्यस्‍थळी काँक्रिटची गुणवत्‍ता पडताळणी करण्‍याऐवजी रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प ठिकाणी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडते का, याची पडताळणी करणे अधिक महत्‍त्‍वपूर्ण ठरते. हे सुनिश्चित करण्‍यासाठी महानगरपालिकेने आर. एम. सी. प्रकल्‍पस्‍थळी गुणवत्‍ता देखरेख संस्‍थेची नियुक्‍ती केली आहे. या गुणवत्‍ता देखरेख संस्‍थेचे प्रतिनिधी पूर्ण वेळ प्रकल्‍पस्‍थळी नियुक्‍त असतात. हे प्रतिनिधी आर.एम. सी प्रकल्‍पस्‍थळी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो का, यावर देखरेख ठेवतात.

या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी काल (दिनांक १ एप्रिल २०२५) रात्री तुर्भे येथील आर.एम.सी. प्रकल्‍पास आकस्मिक भेट दिली. या पाहणीदरम्‍यान, काँक्रिटसाठी वापरण्‍यात येणा-या पाण्‍याची गुणवत्‍ता तपासण्‍यात आली. यावेळी पाणी स्‍वच्‍छ आढळले. या पाण्‍यात बर्फाच्‍या लाद्या टाकण्‍यात आल्‍या होत्‍या, जेणेकरून काँक्रिट मिश्रण करताना पाणी थंड राहिल, याची दक्षता घेण्‍यात आली होती. काँक्रिट मिश्रणासाठी वापरल्‍या जाणा-या वेगवेगळ्या घटकांची (एग्रीगेट) जसे की, १० एमएम., २० एमएम., क्रश सॅण्‍ड आदींची पाहणी करण्‍यात आली. या घटकांवर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार, पाणी शिंपडण्‍यात येत असल्‍याचे आढळून आले. 'स्प्रिंकल्‍स'चा प्रवाह सुधारण्‍याची आवश्‍यकता वाटल्‍याने तशा सूचना आर.एम.सी. प्रकल्‍प चालकास देण्‍यात आल्‍या.

 त्यानंतर प्रकल्‍पस्‍थळावरील नियंत्रण कक्षात जाऊन काँक्रिटीकरणाच्‍या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्‍यात आली. काँक्रिट बनवताना सिमेंट, एग्रीगेट, मायक्रो सिलिका, फ्लाय ऍश आदींचे प्रमाण किती असावे, पाणी किती प्रमाणात मिसळावे इत्यादी सर्व संगणकीकृत पद्धतीने निश्चित केले जाते. तसेच, त्‍याबाबतचे निरीक्षण नोंदविले जाते. या संपूर्ण प्रक्रियेची भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापकांमार्फत तपासणी करण्‍यात आली. ती योग्य असल्‍याचे आढळले. प्रकल्‍पस्‍थळी असलेल्‍या प्रयोगशाळेत स्लम्प कोन, क्यूब आणि बीम कास्टिंग आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे परिणाम अपेक्षेप्रमाणे आढळून आले. त्‍याची नोंद 'लॉग बुक' मध्‍ये करून ट्रान्झिट मिक्‍सर वाहन रवाना करण्‍यात आले.

कॉंक्रिट वाहून नेणाऱया ट्रान्झिस्ट मिक्‍सर वाहनांवर वाहनांचे थेट स्थान आणि हालचाल यांचा मागोवा घेणारी तंत्रज्ञान प्रणाली अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित आहे का, याची देखील बांगर यांनी पाहणी केली. आर. एम. सी. प्रकल्‍पस्‍थळ ते कार्यस्‍थळ या दरम्‍यान वाहन पोहोचण्‍याचा अपेक्षित कालावधी 'ऑनलाईन' (गुगलॲप) वर पाहून मिक्‍स डिझाईन तयार करण्‍याच्‍या सूचना बांगर यांनी दिल्‍या. या आ‍कस्मिक भेटीदरम्‍यान गुणवत्ता देखरेख संस्थेचे प्रतिनिधी आर.एम. सी. प्रकल्‍पस्‍थळी उपस्थित असल्‍याचे आढळून आले. तसेच, त्‍यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती असल्‍याचे आढळले.   
 
सिमेंट काँक्रिट रस्त्याची गुणवत्ता अत्युच्च राहावी म्हणून काँक्रिट बनविण्यापासून ते काँक्रिट टाकण्यापर्यंत आणि क्युरिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच सुरवातीपासून ते शेवटपर्यंतच्या (एन्ड टू एन्ड) सर्व कार्यवाहीवर महानगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण असणे अत्यावश्यक असल्याचे बांगर यांनी नमूद केले. त्यासाठी आकस्मिक पाहणी दौरे यापुढे देखील केले जाणार असल्याचे श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच आय. आय. टी.चे सहयोगी प्राध्यापक  सॉलोमन देबर्मा यांच्यासह गुणवत्ता देखरेख संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Most Popular News of this Week