दक्षिण आफ्रिकेतील नामांकित कॉम्रेड मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन व अनेक प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग घेतलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सेंट्रल पार्क, खारघर येथे पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन' मध्ये सहभागी होत 21.2 किलोमीटरचे अंतर 2 तास 26 मिनिटे 22 सेकंदात पूर्ण केलेआणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अत्यंत महत्त्वाचा कारभार सांभाळताना आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातही डॉ. कैलास शिंदे यांनी दररोज पहाटे लवकर उठून धावण्याचा सराव मागे पडू दिला नाही व यामुळे दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. ध्येय, मेहनत व सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणेच आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वाची ठरणारी जिद्द या धावण्याच्या सरावातून त्यांनी मिळविली आहे. खारघर हिल मॅरेथॉन मधील आणखी एका यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.