मुंबई, हा चार राज्याचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन स्वीकारण्यासाठी आलेल्या शरद पवारांनी मिडियाशी बोलताना आपली भूमिका मांडली.
काल चार राज्यांचा लागलेला निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कालचे जे निकाल आले आहेत त्याबद्दल भाजप सोडून इतर पक्ष यांच्यामध्ये समाधान आहे.भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा पर्याय महत्वाचा आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली..आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती त्याचाही राजीनामा त्यांनी दिला आहे...सीबीआयमधील वाद समोर आला आहे. काही मर्यादा ठेवायला पाहिजे. पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती या निवडणूकीत ते विसरले आणि फक्त एक कुटुंब मांडत राहिले. ज्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही. मात्र तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले त्याचा परिणाम असा निघाला आहे. दरम्यान त्यांच्यावर हल्ले का करण्यात आले याबाबत लोकांमध्ये प्रश्न होता असेही शरद पवार यांनी सांगितले.
देशाच्या संविधानावर हल्ला झाला. त्याबद्दलही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी, आदिवासी यांचा फटका बसेल असे वाटले होते. मात्र शहरी भागात ही ५० टक्के त्यांना फटका बसला आहे ही परिवर्तनाची सुरुवात आहे असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवलं ते लोकांनी मान्य केलं आहे. आघाडी नाही मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी आपले मतभेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
तिसरी आघाडी किंवा युपीए ३ असं काही नाही असणार मात्र देशपातळीवरील प्रश्नासाठी आपापसातील मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे अशी स्पष्ट भूमिकाही खासदार शरद पवार यांनी मांडले.
दरम्यान निवडणूकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल आणि निवडणूकीमध्ये एकत्र येतील याबाबत शंका नाही असा टोलाही शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला.