मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या १,३८४ घरांच्या लॉटरीसाठी ५ नोव्हेंबरपासून सुरु झालेली नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत सोमवारी, १० डिसेंबरला रात्री १२ वाजता संपली. या मुदतीत १ लाख ६४ हजार ४२४ जणांनी घरासाठीच्या अर्जाची नोंदणी केली. म्हाडाच्या एका घरासाठी सरासरी ११८ अर्ज आले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजता अर्जविक्री स्वीकृतीची मुदत संपल्यानंतर १ लाख ५१ हजार ५३२ इच्छुकांनी नोंदणी केली. तर १ लाख ९७ हजार १८३ नोंदणीधारकांनी अर्ज भरले असून अनामत रकमेसह १ लाख ६४ हजार ४२४ अर्ज सादर झाले आहेत. एका घरासाठी सरासरी ११८ अर्ज आले आहेत. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर १३ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा अन्य चुका असल्यास अर्जदारांना मुंबई मंडळाशी संपर्क साधत आवश्यक ते बदल करून घेता येतील. त्यानंतर लॉटरीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी १५ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता जाहीर होईल.
अंतिम यादीत ज्यांची नावे असतील ते अर्जदार लॉटरीत सहभागी होतील. त्यानंतर १६ डिसेंबरला म्हाडा भवनात सकाळी दहा वाजता लॉटरीचा निकाल जाहीर होईल.