मुंबई - तीन राज्यांच्या निवडणूक निकालांतून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली. फडणवीस सरकारचेही काही महिनेच उरले असून आगामी निवडणुकीत त्यांना सत्तेवरून खाली खेचून शेतकरी, महिला, तरुण, वंचितांच्या हितासाठी काम करणारे काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करून विजय मिळवला. हा भाजपच्या धनशक्तीवर काँग्रेसने मिळवलेल्या जनशक्तीचा विजय असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित असल्याचे चव्हाण म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या निकालात मंगळवारी १२ वाजता काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर गांधीभवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत जनतेने तिन्ही राज्यांतील लोकविरोधी भाजपचा पराभव केला आहे. भाजपने फार मोठ्या प्रमाणात सत्ता व पैशाचा गैरवापर केला. पण या निकालाच्या माध्यमातून हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या केंद्र सरकारला जनतेने जागा दाखवली आहे.
मी लोकसभा लढवणार नाही, असे म्हटलेच नाही
मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे कधीच म्हटलेले नाही. त्यासंदर्भातला निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील. राज्यात छोट्या पक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादी काही जागा सोडणार असून आमची आघाडी व्यापक होईल, असेही खासदार अशोक चव्हाण या वेळी म्हणाले.