कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ.
खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या.
मुंबई। कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढ्या द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत आणि ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरिब अधिक गरिब होत चालला पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात ही अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मोदी सरकारचे कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे. नाही रे वर्गासाठी लढले पाहिजे, कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही, कृती कार्यक्रम घेऊन काम करा, मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा द्या, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.