हैडलाइन

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि नियमबाह्य छाटणीप्रकरणी दोन हाऊसिंग सोसायट्यांविरोधात पोलीस ठाण्‍यात गुन्हे दाखल

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. वृक्षांना इजा पोहोचविणे तसेच मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संकुलाबाहेरील वृक्षांना इजा पोहोचवल्याप्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि विकासकाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या आवारातील वृक्षांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याचे आढळून आल्याने संबंधित गृहनिर्माण संस्थेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मुंबईतील वृक्ष हे महानगराच्‍या पर्यावरणीय समतोलाचे महत्त्वाचे घटक आहेत. वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करून वृक्षांना इजा पोहोचविणाऱ्या किंवा परवानगीच्या अटींचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ डीजीएम शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी आहे. या हाऊसिंग सोसायटीसमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाईन तक्रार पी उत्तर विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्‍या अधिका-यांनी तक्रारदार समवेत संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत सुमारे २० ते २२ छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले. तसेच, हाऊसिंग सोसायटीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. हाऊसिंग सोसायटीने झाडांना हानी पोहोचविल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाल्याने, संबंधितांविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ सह कलम २१ अन्वये कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड गृहसंकुलात १०० हून अधिक झाडांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याची तक्रार एन विभागाकडे प्राप्‍त झाली. तक्रारीच्‍या अनुषंगाने संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्‍यात आली. वृक्षांच्या छाटणीसाठी महानगरपालिकेकडून विशिष्ट अटी व मर्यादांसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत मंजूर परवानगीच्या कक्षेबाहेर जाऊन अधिक प्रमाणात छाटणी करण्यात आल्याचे आढळून आले. कोणत्याही वृक्षाची तोड, इजा किंवा छाटणी करण्यापूर्वी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे तसेच मंजूर अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था अथवा विकासकाविरुद्ध कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूद आहे. त्‍यानुसार, कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संस्थेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्‍हणाले की, कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये अथवा इंजेक्शन देणे, झाडे तोडणे किंवा नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे.


Most Popular News of this Week

आज से एक पखवाड़े तक बरसेगी...

उत्तर भारत में भगवान महादेव की स्तुति के श्रावण का पवित्र महीना कल से शुरू...

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...