मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद – खा. सुनील तटकरे


मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद – खा. सुनील तटकरे

सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कुटुंबाचा अवमान हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

“लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संस्कार लाभलेल्या या कुटुंबाने भारतीय संगीताला जागतिक पातळीवर नेले. अशा परिवाराविषयी अवमानकारक शब्द वापरणे हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे,” असे तटकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “प्रसिद्धीसाठी मुद्दामून अशी विधानं करणे ही अत्यंत हलकी आणि फुटकळ वृत्ती आहे. अशा वक्तव्यांनी समाजात चुकीचा संदेश जातो. आपले शब्द आणि विचार जबाबदारीने वापरणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. एक प्रतिष्ठित आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुटुंबावर आरोप करणे, हे पूर्णपणे अनावश्यक आणि निषेधार्ह आहे.”

तटकरे यांनी विरोधकांना इशारा देत सांगितले की, “मंगेशकर कुटुंब हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या सांस्कृतिक उभारणीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे अशा कुटुंबाविषयी विधान करताना संयम, संवेदनशीलता आणि आदर राखणे आवश्यक आहे.”

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी असून, या प्रकरणी राज्य सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी शासनाने दिलेल्या सवलतींचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक खासगी रुग्णालयाचे कर्तव्य आहे. जर त्या सवलती नाकारल्या जात असतील तर संबंधित रुग्णालय, प्रशासन आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, असेही तटकरे यांनी ठामपणे सांगितले.


Most Popular News of this Week