शिरवणेत विविध धार्मिक कार्यक्रम
स्वयंभू गणेश मंदिर वर्धापन व पालखी सोहळा
नवी मुंबई : शिरवणे येथील श्रीगणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने शिरवणे येथील श्री स्वयंभू गणेश मंदिराचा 15 वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा शुक्रवार व शनिवार रोजी विविध धार्मिक, विधिवत पूजापाठ करून साजरा केला जाणार असल्याचे माजी महापौर व ट्रस्टचे सचिव जयवंत सुतार यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळपासून श्री गणेश याग प्रारंभ, मुख्यदेवता , अग्नी, नवग्रह देवता स्थापना तसेच विविध धार्मिक पूजापाठ विधिवत होणार आहेत. सायंकाळी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ,( रोहिंजन ) सुनिल पाटील बुवा यांचे सुश्राव्य भजन तर रात्रौ हभप शारदाताई सूर्यवंशी -जाधव (नाशिक) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी विविध धार्मिक पूजा आणि महाआरती, दुपारी श्री विष्णूलक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळ ( दापोली-पारगाव) गायिका कुमारी स्नेहल पाटील यांचे सुश्राव्य भजन तर दुपारी ठाणे -बेलापूर पंचक्रोशीतून स्वयंभू गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर सायंकाळी हनुमान प्रासादिक भजन मंडळ, शिरवणे बुवा नंदकुमार सुतार व देवेंद्र पवार यांचे भजन होणार असून सायंकाळी श्री गणेश पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, सचिव जयवंत सुतार यांनी कळविले आहे.