हैडलाइन

मुंबईकरांनी पाण्याचा अत्‍यंत जपून व काटकसरीने वापर करण्‍याचे आवाहन

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी सर्व भागांमध्ये समसमान पद्धतीने करावी. पाणी कपातीमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले, तरी टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग किंवा अन्य संवेदनशील क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक तुटवडा जाणवत असल्यास, तेथील नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी जलवाहक (टँकर) द्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा करावा, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईकरांनी पाण्याचा अत्‍यंत जपून व काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहनही बांगर यांनी केले आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यस्थळी (On Field) कार्यरत जल अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांची महत्त्वपूर्ण बैठक महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी उपस्थित दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांच्याशी संवाद साधला. उपायुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्‍तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर म्‍हणाले की, जून महिना सुरू होऊनही अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यासच जलसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या यंत्रणेने अधिक सतर्क राहून पाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. एकीकडे पाणी कपात लागू असताना, दुसरीकडे पाणीचोरी व पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्‍यात. अधिकृत जळजोड घेण्‍यासाठी नागरिकांना प्रोत्‍साहित करावे. ज्‍या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्‍या ठिकाणी कायस्‍वरूपी पाणीपुरवठा करण्‍यासाठी नियोजन करावे. एकूणच,टँकरवरील अवलंबीत्‍व कमी करावे, अशा सूचना बांगर यांनी दिल्‍या.   

पाणी कपातीच्या कालावधीत संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक व  स्थानिक रहिवासी यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद व समन्‍वय साधावा. पाणी वितरण व्यवस्थेबाबत त्यांना वेळोवेळी अद्ययावत माहिती द्यावी. तसेच भौगोलिक परिस्थिती, उद्भवणाऱ्या अडचणी व तक्रारी, तसेच त्यांचे निराकरण करण्यासाठी जल अभियंता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी. पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्यांचा जलद निपटारा करावा व त्यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमितपणे सादर करावी. प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्‍त यांचे सहाय्य घ्‍यावे. टँकरची उपलब्‍धता अधिक ठेवावी, असे विविध निर्देश बांगर यांनी दिले.

 अभिजीत बांगर म्‍हणाले की, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे तसेच जलवाहिन्यांचे सक्षमीकरण (Augmentation) करण्याची कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात यावीत. यासाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक मंजुरी व निविदा प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावी. संबंधित कामांचे कार्यादेश निर्गमित करून  प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात यावी. तसेच ही कामे निश्चित कालमर्यादेत व उच्च दर्जाची पूर्ण होतील, यासाठी संबंधित विभागाने नियमित देखरेख व समन्वय राखावा. ज्‍या नवीन ठिकाणी जलवाहिनी अंथरण्‍यात आली असेल ती विनाविलंब भारित (Charge) करावी. एकंदर, 'एल निनो' च्‍या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानावर परिणाम होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्‍याचा अंदाज आहे. यामुळे महानगरपालिका यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करताना अभिजीत बांगर हणाले की, सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत टाळावा. तसेच, विशेषतः मोठ्या गृहनिर्माण संस्था व निवासी संकुलांनी आपल्या परिसरात पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा दुराग्रह करू नये. त्‍याऐवजी व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा पुनर्संचयित (Restore) होईपर्यंत परिस्थिती गंभीर राहणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहनदेखील अभिजीत बांगर यांनी केले आहे.



Most Popular News of this Week

पालघर के शहीद संतों के...

पालघर में विगत वर्षों शहीद हुए संतों के परिजनों को आज तक कोई सरकारी मदद नहीं...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

अनुदानित गॅस सिलेंडर ९ वरून ४...

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...