कोकण प्रादेशिक कार्यक्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर उपविभागांतर्गत सहाय्यक लाईनमन म्हणून कार्यरत असलेले अमोल कदम यांनी गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कर्तव्यनिष्ठा दाखविली. मुसळाधार पाऊस, प्रतिकूल हवामान व अव्हानात्मक परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी सलग चार दिवस उपकेंद्रातच मुक्काम करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविरत मेहनत घेतली. त्यांच्या या प्रामाणिक कामामुळे आणि सेवाभावामुळे महावितरणची ‘प्रकाशदूत’ ही भूमिका खऱ्या अर्थाने सिद्ध झाली.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान वीजपुरवठा अखंडित राखण्यासाठी अमोल कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अविरत कष्ट घेतले. सलग तब्बल चार दिवस उपकेंद्रमध्येच मुक्काम करून त्यांनी आपल्या कर्तव्याचे अत्यंत निष्ठेने पालन केले. कर्करोग सारख्या दुर्धर आजाराशी धैर्याने झुंज देत असतानाही अमोल कदम यांनी महावितरण प्रती असलेली आपली कर्तव्यनिष्ठा, बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव कायम जपली आहे.
या उल्लेखनीय सेवाभावाची दखल घेत कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक, दिलीप जगदाळे यांनी खालापूर उपविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन अमोल कदम यांचे कौतुक व सन्मान केले. त्यांच्या या समर्पित सेवेबद्दल वैयक्तिकरित्या गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले. जगदाळे यांची ही भेट व त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे खालापूर उपविभागामधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे.
दिलीप जगदाळे म्हणाले कि, “महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक सेवा ही केवळ जबाबदारी नसून ती कर्तव्यनिष्ठे ची आणि सेवाभावाची शपथ आहे. अतिवृष्टी सारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा अडचणींवर मात करून अमोल कदम यांनी दाखवलेली जिद्द, समर्पण आणि कर्तव्य भावना संपूर्ण महावितरण परिवारासाठी प्रेरणादायी आहे. अशा निष्ठावान कर्मचाऱ्यांचा कार्याचा सन्मान करणे ही कंपनीची जबाबदारी असून त्यांचा या सेवाभावाचा माला मनापासून अभिमान आहे”.