देवांना जातीत विभागले जातेय हे गंभीर आहे - अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा तिसरा दिवस;भाजप शिवसेनेवर शरसंधान...
नवी मुंबई: मुस्कटदाबी... दादागिरी सुरु आहे... कुणी काय खायचं आणि कसं लिहायचं हे यांनी ठरवायचं... त्यामुळे आता फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी या जाहीर सभेत भाजप सेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधले. आपल्या सोबत मन की बात आणि अदानी - अंबानी सोबत धन की बात असे बोलत नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली.
हिंदु मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी पत्नी हिंदू असल्याचे सांगितल्यावर जा पाकिस्तानमध्ये, अरे हिंदुस्तान काय तुमच्या बापाच्या सातबारावर लिहिला आहे का असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मोदी यांची नक्कल करून त्यांच्या वेगवेगळ्या योजनांवर जोरदार हल्लाबोल केला.
देवांना जातीत विभागले जातेय हे गंभीर आहे - अजित पवार
अठरापगड जातींचा हा देश व राज्य आहे. स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वाट्टेलते हे सरकार करत आहे. सुरुवातीला जातीजातीमध्ये भांडणे लावली जात होती आणि आता यांनी देवांनाही जातीत विभागायला सुरुवात केली आहे हे गंभीर असून हे रोखले पाहिजे असे मत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत व्यक्त केले.
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत असून याला सेना-भाजपचे सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या नुसत्या विकासाच्या गप्पा सुरु आहेत. कुठाय विकास, कुठाय स्वच्छ भारत, कुठाय भ्रष्टाचार मुक्त भारत असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.
या सभेत अजितदादा पवार यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अजितदादा पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांनी सेनेला दुतोंडी म्हटले आहे हे सांगतानाच एका सभेत शिवसेनेला दुतोंडी गांडुळ म्हटले त्यामुळे सामना मध्ये अग्रलेख लिहून जोरदार टीका केली होती. परंतु आता याचे संपादक दुतोंडी वर काय लिहितात हे पाहायचे आहे असे आव्हान अजितदादा पवार यांनी दिले.
सेना - भाजप विरोधक असल्याचं नाटक करत आहेत - जयंतराव पाटील
आज दोन्ही पक्षांचे प्रमुख एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका आणि वक्तव्य करत आहेत. हे दोघेही विरोधक वागण्याचं नाटक करत आहेत असा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत केला.
शिवसेना - भाजप युतीला आम्ही घाबरत नाही. शिवसेनेलाच भीती आहे. सत्तेत राहून भाजप सेनेला संपवत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
छत्रपतींच्या आशिर्वादाने सुरु केलेली ही परिवर्तन यात्रा महागाई. पेट्रोल-डिझेलचे आणि गससिलेंडरचे दर वाढवण्याचे पाप भाजप सरकारचे आहे असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले.
सत्ता जाणार म्हणून पराभूत मानसिकतेमध्ये नरेंद्र - देवेंद्रांचे सरकार गेले आहे आणि म्हणून कोणत्या घटकाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने द्यायला सुरुवात केली आहे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून पहिली सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत माजी मंत्री गणेश नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपले विचार मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,जिल्हाध्यक्षा अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार महिला जिल्हाध्यक्षा विदया सुतार आदींसह नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.