भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची स्मृती कायम राहावी, म्हणून या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात येते.
त्यानिमित्ताने 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२५-२६' च्या पुरस्कारप्राप्त ५० शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर रितू तावडे व शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली.
आदर्श शिक्षक निवड प्रक्रियेअंतर्गत दिनांक २१, २२ आणि २४ ऑगस्ट २०२६ रोजी माटुंगा येथे 'सिटी ऑफ लॉस एंजलिस महानगरपालिका शाळा (मनमाला देवी मंदिराजवळ) या ठिकाणी निवड समितीमार्फत महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील एकूण १२१ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती, प्राप्त प्रस्ताव तसेच उपलब्ध शैक्षणिक, प्रशासकीय व कार्यविषयक नोंदींच्या आधारे अंतिम छाननी करून ५० गुणवंत शिक्षकांची ‘आदर्श शिक्षक – महापौर पुरस्कार २०२५-२६’ साठी निवड करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे महापौर रितू तावडे व शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी कैलास आर्य आदी उपस्थित होते.
शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू झाली. या परंपरेनुसार सध्या दरवर्षी ५० आदर्श शिक्षकांना ‘महापौर पुरस्काराने’ गौरविण्यात येते.
या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना त्यांच्या शैक्षणिक कार्यातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमधील योगदान, शाळेच्या विकासासाठी केलेले कार्य तसेच सामाजिक बांधिलकी या बाबींचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान न देता त्यांच्यामध्ये विविध कौशल्ये, मूल्ये, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील या आदर्श ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११,०००/- (ECS द्वारे बँक खात्यात जमा), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, स्मृतिचिन्ह, मानपत्र/प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करून समारंभपूर्वक सन्मानित केले जाणार आहे.