हैडलाइन

मुंबई शहर विभागातील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर रितू तावडे यांनी केली पाहणी

श्रीगणरायाचे आगमन आणि त्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली तयारी समाधानकारक आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणतेही अडथळे येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. तसेच मूर्ती विसर्जनासाठी अधिकाधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्तींचे विसर्जन वेगाने करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. श्रीगणेश मूर्ती विसर्जन आणि इतर नागरी सुविधा विनामूल्य पुरवल्या जात असल्याची माहिती फलक स्वराज्यभूमीसह सर्व विसर्जन स्थळांवर जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शित करावेत, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली तयारी, विशेषतः विसर्जन स्थळांवरील पूर्वतयारी आणि उपलब्ध करून दिलेल्या नागरी सेवा-सुविधांची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहर विभागात पाहणी दौरा केला.


श्रीगणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकरांची श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांची संपूर्ण पाहणी महापौर रितू तावडे यांनी केली. त्यासाठी विविध नैसर्गिक विसर्जन स्थळांना तसेच कृत्रिम तलावांना भेट देऊन एकंदर व्यवस्थेचा आढावा घेतला.

पाहणी दौऱ्याची सुरुवात भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथून झाली. त्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), वरळीतील लोटस जेट्टी, दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगत बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन आणि केळुसकर मार्ग (उत्तर), शीव (सायन) तलाव इत्यादी ठिकाणी महापौरांनी पाहणी केली.


स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करावी. तसेच येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता फिरत्या प्रसाधनगृहांची संख्या वाढवावी, गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, पुरेशा प्रमाणात जीवरक्षकांची नियुक्ती करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.

सर्व विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेली व्यवस्था, कृत्रिम तलावांची बांधणी, श्रीगणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधा, तसेच विसर्जनाच्या दिवशी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना यांचा सर्वंकष आढावा महापौर रितू तावडे यांनी घेतला.

या पाहणी दौऱ्यात सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष तथा मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष मानसी सातमकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, नगरसेवक गौरांग झवेरी, नगरसेविका वनिता नरवणकर यांच्यासह उप आयुक्त (परिमंडळ १)  चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई, डी विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंखे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर आदींसह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्रीगणेशोत्सव २०२६ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव २०२६ निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निर्मित श्रीगणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात करण्यात आले.

यावेळी सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत दामले आदी यावेळी उपस्थित होते.


या माहिती पुस्तिकेत श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांची माहिती, विविध नागरी सेवा-सुविधा, श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा प्रवेश अर्ज आदींसह सार्वजनिक मंडळांसाठी आवश्यक माहितीचा समावेश आहे.



Most Popular News of this Week

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७...

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ च्या सामाजिक,...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

अंधेरीतील चित्रकूट मैदान...

अंधेरी परिसरातील चित्रकूट मैदानस्थित डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स...