महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी गणेशभक्तांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरांत, गल्लीबोळांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या उत्सवाची सर्वाधिक आतुरतेने वाट पाहणारे निरागस मन म्हणजे लहान मुलांचे. बाप्पाच्या आगमनाचा आनंद, त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील उत्सुकता आणि आपल्या लाडक्या गणरायाला सजविण्याची त्यांची ओढ याला खरोखरच तोड नाही. याच बालमनातील भक्ती, कल्पकता आणि आनंदाला सुंदर व्यासपीठ देत दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 'जॅक अँड जिल' स्कूलमधील प्री-स्कूलच्या चिमुकल्यांसाठी गणपती बाप्पांच्या मूर्ती रंगविण्याचा आगळावेगळा आणि सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आला.
दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू नागरिकांना संगणक तसेच विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठीही प्रतिष्ठानकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच सामाजिक बांधिलकीचा आणि संस्कारक्षम उपक्रमांचा एक भाग म्हणून यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांसाठी बाप्पांच्या मूर्तींना स्वतःच्या कल्पनेतील रंग देण्याचा हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. प्रतिष्ठानच्यावतीने लहान मुलांना रंगविरहित गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या. आपल्या मनातील बाप्पाचे रूप कल्पनेत साकारत या चिमुकल्यांनी विविध रंगांच्या माध्यमातून गणरायाला सजविले. कुणी बाप्पांच्या मुकुटाला आकर्षक रं`ग दिला, कुणी त्यांच्या वस्त्रांना सुंदर रंगसंगती दिली, तर कुणी आपल्या कल्पकतेने गणरायाचे रूप अधिकच मोहक केले. प्रत्येक चिमुकल्याच्या हातातील रंगांची उधळण जणू भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या बालमनाचीच सुंदर अभिव्यक्ती होती.
या उपक्रमात लहान मुलांनी आपल्या पालकांसोबत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बाप्पांना रंग देताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, डोळ्यांतील उत्सुकता आणि आपल्या हातांनी सजविलेल्या गणरायाकडे पाहताना उमटणारे समाधानाचे भाव उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. रंग, कुंचला आणि चिमुकल्यांची कल्पनाशक्ती यांच्या सुंदर मिलाफातून साकारलेल्या गणरायाच्या मूर्तींमधून बालमनातील निरागस भक्तीचे दर्शन घडले. यावेळी नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था पाहिली. त्यांनी चिमुकल्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुलांनी रंगविलेल्या बाप्पांच्या मूर्तींचे कौतुक करत त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन दिले.
बालमनाला आनंद देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल पालकांनी दिना बामा पाटील प्रतिष्ठानचे आणि नगरसेविका राजोल संजय पाटील यांचे मनापासून आभार मानले. समाजोपयोगी कार्यासोबतच मुलांच्या कल्पनाशक्तीला, कलागुणांना आणि संस्कारांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सातत्याने आयोजित होत राहावेत, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली. चिमुकल्यांच्या हातातील प्रत्येक रंगातून उमटलेली गणरायाची प्रतिमा आणि त्यांच्या ओठांवरील बाप्पाचे नाव यामुळे हा उपक्रम भक्ती, आनंद आणि बालसर्जनशीलतेचा सुंदर संगम ठरला.