मिरज : जिल्ह्यात वस्तू व सेवा कराची वसुली सुरू झाल्यानंतर यावर्षी जुलैपासून सहा महिन्यात कर संकलनात २५ टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ८७२ कोटी जीएसटी कर वसुली झाली होती. यावर्षी जुलै ते डिसेंबरपर्यंत सुमारे १३५ कोटी जादा करवसुली झाली आहे. गतवर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत ही वसुलीची रक्कम २५ टक्के जास्त आहे. करदात्यांच्या नोंदणीतही दहा टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील दहा तालुक्यात २० हजार नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. ८७२ कोटी करवसुली झाली होती. १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील करवसुलीचा ७७७ कोटींचा आकडा गतवर्षी ८७२ कोटींपर्यंत पोहोचला होता. चालूवर्षी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सुमारे २६ हजार व्यावसायिकांकडून चालू वर्षात जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत ८७२ कोटी करवसुली झाली आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने, अन्न प्रक्रिया उद्योग, औद्योगिक संस्था, गृहबांधणी व्यावसायिक, बांधकाम ठेकेदार यांसह पायाभूत सुविधा देणाºया उद्योजक व व्यावसायिकांकडून वस्तू व सेवा कराच्या वसुलीद्वारे कर संकलनात वाढ झाली आहे.
नोंदणीकृत ३० टक्के व्यावसायिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे अद्याप कर भरलेला नाही. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाईसह करवसुली झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वस्तू व सेवा कराची आकारणी सुरू झाल्यानंतर करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ५० हजारापेक्षा जादा किमतीच्या माल वाहतुकीसाठी ई-वे बिलाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मालवाहतुकीच्या तपासणीसाठी काही ठिकाणी चेकपोस्ट सुरु केले आहेत. सांगली जिल्ह्यात म्हैसाळ ते जतपर्यंत २२० किलोमीटर कर्नाटक सीमा असल्याने, रस्ते तपासणी पथके तैनात केली आहेत.
मार्केट यार्डातील कर वसुली १ फेब्रुवारीपासून
या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केल्याने मार्केट यार्डातील कोट्यवधीचे व्यवहार ठप्प आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतरही सेवा कर वसुलीचे कामकाज थांबवण्यात आलेले नाही. १ फेब्रुवारीपासून थकीत सेवा कर व्यापाºयांकडून वसूल करण्यात येणार आहे. सांगलीनंतर तासगाव व अन्य ठिकाणी अडत व्यापाºयांकडून सेवा कर वसुली करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.