डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती करताना त्याला दिशादेखील दिलीः मुख्यमंत्री
महापरिनिर्वाण दिनी विविध मान्यवरांकडून चैत्यभूमी येथे अभिवादन
प्रत्यक्ष न येता ऑनलाईन अभिवादन करण्याच्या महानगरपालिकेच्या आवाहनाला अनुयायांनी दिला शंभर टक्के प्रतिसाद
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक जनजागृती पूर्वीही झाली आणि आजही त्याच्या विचारांच्या प्रेरणेतून समाज जागृती होण्याची प्रक्रिया सुरु आहे. बाबासाहेबांची थोरवी त्यातून सिद्ध होते,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
‘क्रांती करणे हे अतिशय कठीण काम असते. तर त्या क्रांतीला दिशा देणे आणि समवेत त्याला शिस्तीची चौकट घालून देणे, हे त्याहूनही कठीण असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे साध्य तर केलेच. पण आपल्यानंतरही ते टिकून राहील, असे मौलिक विचार आम्हा सर्वांना दिले,’ असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी काढले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी स्मारक (दादर) येथे आज (दिनांक ६ डिसेंबर २०२०) सकाळी शासकीय मानवंदना प्रदान करुन अभिवादन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या मानवंदना कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजीत पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा मंत्री श्री. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, माजी खासदार व माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. विजय बालमवार, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अनुयायी देखील याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामध्ये एकोपा राखण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून योगदान दिले. समाजाची उन्नती करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या करुणा, दया भावनेवर डॉ. बाबासाहेबांनी भर दिला. समाजात बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे जनजागृती आली आहे. देशाला एकसंध ठेवून, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आजही गरज आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाऊया, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घराघरातून अभिवादन करण्यात येत आहे. एरवी दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर निळा सागर उसळतो. मात्र यंदाच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी स्थिती वेगळी आहे, कारण कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता घराघरातून अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशाला, समाजाला बाबासाहेबांचे अनुयायी कशी मदत करतात, त्याचा पुरावा म्हणजे आजचे दृश्य आहे. खरा भीमसैनिक काय ते आज सर्व अनुयायांनी दाखवून दिले. सरकारच्या, महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. या वर्षी शिस्त व संयमाचे अद्भूत दर्शन घडले आहे. क्रांती करणे हे कठीण, तर त्याला शिस्तीच्या चौकटीत बसवणे हे त्याहूनही जास्त कठीण असते. बाबासाहेबांनी क्रांती करताना त्याला दिशा दिली. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज आम्ही सारेजण या पदांवर विराजमान आहोत, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी नमूद केले.
विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले म्हणाले की, बाबासाहेबांचे हृदय हे समुद्रासारखे विशाल होते. पीडित, शोषितांना माणूस म्हणून जगता यावे, यासाठी झटलेल्या बाबासाहेबांच्या जीवनातून माणुसकीचे विशाल दर्शन घडते.
उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार म्हणाले की, एवढा मोठा वैविध्यपूर्ण भारत देश एकसंध राहण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी संविधान दिले. बाबासाहेबांचे इंदू मिल जागेवर साकारत असलेले स्मारक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी काम सुरु आहे.
यावेळी इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी चैत्यभूमी येथे मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. राज्य शासनाच्या वतीने शासकीय मानवंदना प्रदान करण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केलेल्या माहिती पुस्तिकेचे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचे मुखपत्र लोकराज्य या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
दरम्यान, कोरोना संसर्ग पसरु नये, यासाठी खबरदारी म्हणून यावर्षी देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता ऑनलाईन प्रक्षेपणातून अभिवादन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते. त्यास अनुयायांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची दरवर्षी दिसणारी प्रचंड गर्दी यंदा झाली नाही. सरकारने तसेच महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद देऊन अनुयायांनी सर्वांसमोर अनोखे उदाहरण ठेवले आहे. त्याचा उल्लेखही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केला.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समवेत राष्ट्रीय दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे यूट्यूब, फेसबूक, ट्विटर खात्यांवरुनही चैत्यभूमीसह राजगृह येथील अभिवादनाची थेट प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली. यामुळे देशभरातील अनुयायांना आपापल्या घरी राहून चैत्यभूमीचे दर्शन घेणे व अभिवादन करणे शक्य झाले.