मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण
शिक्षण विभाग व बायजूस संस्था यांच्यात दावोसमध्ये सामंजस्य करार
पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करार
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याच्या अखत्यारितील विविध शाळांमध्ये ज्ञानाचे धडे गिरविणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी निमित्त ठरला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात करण्यात आलेला सामंजस्य करार. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) झालेल्या या करारामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग ऍप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणा-या शिक्षकांना देखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, उद्योग आणि खनिकर्म खात्याचे मंत्री श्री. सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव श्री. आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे श्री. बायजू रविंद्रन हे दावोस मध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता व्हर्च्युअल क्लासरूम, डिजीटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन अविरतपणे करण्यात येत आहे. याच शृंखलेत बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.