हैडलाइन

बेलापूर विधानसभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल


बेलापूर विधानसभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

प्रकल्पग्रस्तांच्या आणि नवी मुंबईकरांच्या प्रश्नांबाबत गजानन काळे यांनी लेखी प्रतिज्ञापत्र केले सादर

बेलापूर विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हजारो नागरिकांच्या समवेत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . याप्रसंगी झालेल्या सभेत गजानन काळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की मागील दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या या दोन्ही महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेची कामे करण्यात अपयश आलेले आहे, राज्य शासनाकडून जनतेच्या कामाकरिता दहा कोटी रुपये निधी घेऊन आल्याचे जर यांनी दाखवले तर मनसेच्या वतीने १५१ रुपयांचे पारितोषिक त्यांना देण्यात येईल असे जाहीर केले तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडत गजानन काळे यांनी विरोधकांवर प्रहार केला गरजे पोटी बांधलेली घरे अजूनही नियमित झालेली नाहीत प्रकल्पग्रस्तांना अजूनही साडेबारा टक्क्याचा मोबदला मिळालेला नाही असे असताना प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी फसवण्याचे काम या दोन्ही उमेदवारांनी केलेले आहे असे गजानन काळे यांनी सांगितले. 

त्याचबरोबर याप्रसंगी गजानन काळे यांनी पाचशे रुपयांच्या दोन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले की जर बेलापूर विधानसभेतील नागरिकांनी यावेळी संधी दिली. तर प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी घरांचा मुद्दा तसेच साडेबारा टक्के चा मोबदल्याचा मुद्दा निकालात काढू. तसेच एल. आय.जी. ची घरे नियमित करू. सर्व खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करून पुढील पाच वर्षे शाळांची फी वाढ होऊ देणार नाही. नवी मुंबईतील प्रत्येक कंपनीत स्थानिक तरुणांना ८०% नोकऱ्या मिळतील याची तजवीज करू. खाजगी हॉस्पिटल मधील विविध उपचारांचे दरपत्रक निश्चित करून रुग्णांची होणारी लूट थांबवू. आणि असे न केल्यास नवी मुंबईकरांनी माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे लेखी स्वरूपातील ५०० रुपयांच्या  स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र लिहून गजानन काळे यांनी जनतेसमोर आज सादर केले. त्याचबरोबर लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवी मुंबई शहरामध्ये त्यांचा एकही पुतळा त्यांना वंदन करण्याकरता अस्तित्वात नसल्याची खंत या ठिकाणी गजानन काळे यांनी बोलून दाखवली. येत्या सहा महिन्यात दि.बा. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई शहरात उभारला जाईल असे आश्वासन गजानन काळे यांनी याप्रसंगी दिले. तसेच नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर गजानन काळे यांनी घणाघात करत असे म्हटले की काहीजण म्हणतात की आमचे नाव घेतल्याशिवाय इतरांचे राजकारण मोठे होत नाही. मग आपण जर असे म्हणत असाल की आपण म्हणजेच नवी मुंबईचे सर्वात मोठे नेते, तर त्यांनी बिनदिक्कतपणे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवावी. यावेळी पक्ष बदलणाऱ्या दलबदलू नेत्यांना नवी मुंबईकर जनता चांगला धडा शिकवून घरी बसवेल असे गजानन काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी पदन्यास ग्रुपचे सदानंद राणे व शाहीर दत्ता म्हात्रे यांनी महाराष्ट्र गीतांचा कार्यक्रम सादर केला, तसेच व्यासपीठावर मनसेच्या शहर कमिटी सोबत नवी मुंबईतील सफाई कामगार, माथाडी कामगार, महिला रिक्षा चालक, घर कामगार महिला, सिडको सोडत धारक यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. यावेळी नेरूळ येथील रामलीला मैदानापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली व आगरी कोळी भवन येथील निवडणूक कार्यालयाच्या बाहेर रॅलीचा समारोप करण्यात आला.

तसेच महिला रिक्षा चालक, सफाई कामगार यांच्यासमवेत गजानन काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व उपस्थित नागरिक, महिला, तरुण व पदाधिकारी या सर्वांचे गजानन काळे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आणि अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहूदे असे नम्र आवाहन केले.



Most Popular News of this Week