ठाण्यातील जनता दरबारास विक्रमी प्रतिसाद
तब्बल 650 निवेदने प्राप्त
नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावा
वने मंत्री नामदार गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई प्रतिनिधी
राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा आणि भाजपा ठाणे जिल्हा संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील रघुवंशी सभागृहात आज पार पडलेल्या जनता दरबाराला जनतेचा विक्रमी प्रतिसाद लाभला. विविध विषयांवरील सुमारे 650 पेक्षा अधिक लेखी निवेदने नागरिकांनी यावेळी दिली. ज्या निवेदनांवर तात्काळ कारवाई करणे शक्य आहे त्या निवेदनांवर जनता दरबारात उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्ष आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लगेचच कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांचा निपटारा कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावून त्या सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना नामदार गणेश नाईक यांनी यावेळी दिले.
या जनता दरबाराला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भाजपा आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश पदाधिकारी संदीप लेले, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासोबतच महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे. महायुती म्हणून तिन्ही पक्ष जनता जनार्दनाच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
जनता दरबार सुरू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले. १९९५ साली मी मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. ठाणे शहर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे. महायुती म्हणुन आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत. एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही, या टॅग लाईनप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत. आपली गाऱ्हाणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही. त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. जनता दरबारात निवेदने स्वीकाराली जातील आणि १५ दिवसात त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असे नाईक म्हणाले.
कल्याण - डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केले. तसेच दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण-डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली. त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. कल्याण-डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली. घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिले. आता या इमारती बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले असून येथील नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यात त्यांची काहीच चूक नाही. येथील नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे. तसेच माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही मला फोन करून सांगितले की, त्यांच्या भागातही अशाच सात ते आठ इमारती आहेत. तसेच कल्याण ग्रामीणमध्येही अशा अनेक इमारती आहेत, असे नाईक म्हणाले. कल्याण - डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाशांना न्याय देण्याचे आश्वासित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान , दिवा भागातील ५४ बेकायदा इमारतींवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असून पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावर दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही नामदार गणेश नाईक यांनी या भागातील रहिवाशांना दिली.
अवतरण......
सर्वांच्या व्यथा, कथा ऐकून घेऊन समस्यांचा निपटारा करावा. नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. महायुतीचंच काम होतं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासाने, एकोप्याने महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करतं आहे.
-नामदार गणेश नाईक, वनमंत्री