हैडलाइन

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव

महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेला श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आणि विविध सेवा-सुविधांसह साजरा करण्यासह विसर्जन मिरवणुकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदा ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी एकूण ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यंदाच्या उत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापकपणे जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने, यंदा माननीय महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती, एक झाड’  हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईत विसर्जित होणाऱ्या श्रीगणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे. ‘एक गणपती, एक झाड’ या संकल्पनेतून श्रीगणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात येणार आहे. यासोबतच विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यावर व्यापक आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. 

यावर्षी दिनांक १४ सप्टेंबर २०२६ पासून Photographer सुरुवात झाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण मुंबई महानगरात विशेषतः विसर्जन स्थळांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विसर्जन मार्गांवरील अडथळे दूर करण्यासह रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती आणि वृक्षछाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्र किनारे, नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्टील प्लेट, तराफे, क्रेन, रुग्णवाहिका, जीवरक्षक, निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, प्रकाशयोजना, तात्पुरती प्रसाधनगृहे व आवश्यक मनुष्यबळासह विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


श्रीगणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापकपणे जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने, यंदा विसर्जित होणाऱ्या श्रीगणेशमूर्तींच्या संख्येइतकी एक झाडे लावण्याचा संकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे. माननीय महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती-एक झाड’ या उपक्रमाची

श्रीगणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात येणार असून, प्रत्येक श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासोबत एक झाड लावून मुंबईच्या हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा हा उपक्रम आहे. श्रीगणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करून, लोकसहभागातून मुंबई अधिकाधिक हिरवीगार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा महत्त्वपूर्ण संकल्प आहे.

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदा ४४ समुद्र किनारे तसेच जेट्टी, २३ नैसर्गिक तलाव असे एकूण ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि ३८३ कृत्रिम विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन स्थळांवर १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफा, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोट, ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष, ७५ निरीक्षण मनोरे, १ हजार १३२ जीवरक्षक, ६ हजार ५२ फ्लड लाईट/सर्च लाईट, ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे, महानगरपालिकेचे तब्बल २५ हजार अधिकारी तसेच इतर स्वयंसेवी संस्था यावेळी कार्यरत राहणार आहेत. 

माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार, जनहित याचिकेतील अंतिम निर्णय होईपर्यंत दिनांक २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानुसार ६ फूट उंचीपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असून, त्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक व्यवस्था केली आहे. यासाठी योग्य ती जनजागृतीही करण्यात आली आहे. 


पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला बळ देण्यासाठी आणि कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २७८ ठिकाणे मिळून ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. यासोबतच ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तिंसाठी ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिका प्रशासनाकडून सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मुंबईत सर्वाधिक गणेशमूर्ती विसर्जन हे स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटी होते. मुंबईतील सार्वजनिक तसेच घरगुती गणतीही या ठिकाणी येतात. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून याठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी येथे २० मनोरे, १२ कृत्रिम तलाव, ९० प्रसाधनगृह, २२ तराफे, ११९४ जर्मन/स्टील प्लेट, २२ निर्माल्य कलश, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४८फ्लड लाईट, ११ सर्च लाईट, ३ रुग्णवाहिका आणि १ हजार मनुष्यबळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सज्ज ठेवण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शाडू मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना आतापर्यंत ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरीत करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यातसाठी महानगरपालिकेने गत काही वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शाडू मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना शाडू मातीप्रमाणेच पर्यावरणपूरक रंगांचेही मोफत वाटप करण्यात आले आहे. यावर्षी सन २०२६ साठी मूर्तिकारांना २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जन मार्गांवरही पूर्वतयारी करण्यात आली आहे. २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. तर आगमन व विसर्जन मार्गावरील एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.

मुंबई येथील समुद्र किनारपट्टीवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून श्रीगणेशोत्सव मंडळातील किमान ८ ते  १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले आहे.  श्रीगणेशोत्सवात दर्शनासाठी होणारी गर्दी, विद्युत अपघात, आग, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच प्रथमोपचार व सीपीआर बाबतही प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात आले.

सुरक्षित, पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.


Most Popular News of this Week

पचास साल से गणेशोत्सव मना रहे...

चेंबूर कैंप के चर्चित समाजसेवक रमेश लोहाना पिछले 50 वर्षों से श्रद्धा और...

मंत्री आशिष शेलार यांनी...

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील...

CHIEF OF THE NAVAL STAFF VISIT TO NEW ZEALAND

Adm Krishna Swaminathan, CNS, visit to New Zealand, aimed at further strengthening maritime cooperation and enhancing professional and operational linkages between the Indian Navy and the Royal New...

‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत...

नवी मुंबईत ‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत ‘अंगण दत्तक योजना २०२६’चा उत्साहात...

करण अदानी और प्रणव अदानी ने...

मुंबई के प्रसिद्ध चिंचपोकली के चिंतामणि गणपति मंडल में अदाणी परिवार ने...

उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी...

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आजचा पहिला दिवस... सगळीकडे...