चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना दबाव असतो - मेरीकोम

मुंबई : ‘चाहत्यांच्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत असतात. मात्र त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना माझ्यावर दबावही असतो. शिवाय देशवासीयांकडून मिळणाऱ्या मोठ्या पाठिंब्यामुळेच माझा उत्साह वाढतो. त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले,’ असे मत सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर आणि सुपरमॉम एम. सी. मेरीकोम हिने व्यक्त केले.

मणिपूरच्या ३५ वर्षीय मेरीकोम यंदा मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. गुरुवारी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या पुढील योजनांविषयीही चर्चा केली. आपल्या प्रेरणास्त्रोतविषयी तिने म्हटले की, ‘मी जेव्हा बॉक्सिंगला सुरुवात केली, तेव्हा मोहम्मद अली यांना फॉलो करायची. ते माझे आदर्श आहेत. आता इतके वर्ष खेळल्यानंतर माझ्याकडे मिळवण्यासारखे फार काही शिल्लक राहिले नसल्याचे वाटते. तरी आॅलिम्पिक सुवर्ण पदक नसल्याची खंत वाटते. परंतु, आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत ही खंतही दूर होईल.’

मेरीकोम पुढे म्हणाली की, ‘माझ्याकडे आॅलिम्पिक कांस्य पदक, आशियाई सुवर्ण पदक, सहा जागतिक अजिंक्यपद सुवर्ण पदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेचेही पदक आहेत. मात्र अजूनही मी आॅलिम्पिक सुवर्ण पदकाच्या प्रतीक्षेत आहे.’ आॅलिम्पिक स्पर्धेविषयी मेरीकोमने म्हटले की, ‘आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवणे नक्कीच आव्हानात्मक आहे. लंडन २०१२ सालच्या आॅलिम्पिकमध्येही माझ्यापुढे मोठे आव्हान होते. त्यावेळी मी पहिल्यांदाच ५१ किलो वजनी गटामध्ये खेळली होती. यानंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये मी पात्र ठरली नव्हती.’

त्याचप्रमाणे, ‘टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरीता मी खूप प्रयत्न करीत आहे. यासाठी शक्य झाल्यास मी माझ्याहून मजबूत असलेल्या मुलांसोबत सराव करेन. वरिष्ठ खेळाडूंचेही सराव शिबिर सुरु असल्याने ते माझ्यासोबत सराव करु शकणार नाही. जर टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता गाठण्यात यश आले, तर पदक मिळवणे माझ्यासाठी फार कठीण नसेल,’ असा विश्वासही मेरीकोमने यावेळी व्यक्त केला.



Most Popular News of this Week