शैक्षणिक सहलीप्रसंगी घडलेल्या दुर्घटनेची वस्तुस्थिती
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता इमॅजिका थीम पार्क, खोपोली येथे दिनांक 17/02/2025 पासून शालेय सहलीचे नियोजन करण्यात आले होते. दि. 17/02/2025 ते 25/02/2025 पर्यंत एकूण 35 शाळांचे 6666 विद्यार्थी व 557 इतक्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निगराणीखाली नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 236 एसी बसेस मधून सहलीला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानुसार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 76, 77, 53, 95 या शाळांची सहल आयोजित करण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 76, घणसोली येथून सहलीसाठी एकूण 416 विद्यार्थी हे 26 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 14 AC बसेस मधून सकाळी 7:30 वाजता निघाले.
अशाच प्रकारे शाळा क्रमांक 77 यादव नगर येथून 406 विद्यार्थी, शाळा क्रमांक 53 चिंचपाडा इथून 173 विद्यार्थी व शाळा क्रमांक 95 तुर्भे स्टोअर येथून 23 विद्यार्थी असे एकूण 1018 विद्यार्थी 84 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 36 बसेस मधून सहलीसाठी रवाना झाले.
सदर सर्व बसेस इमॅजिका थीम पार्क, खोपोली या ठिकाणी सकाळी 10 वा. सुमारास पोहचल्या. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सर्व मुलांना नाश्ता देण्यात आला. मग मुलांनी शिक्षकांसोबत थीम पार्क मध्ये जाऊन थीम पार्कचा आनंद घेतला. दुपारी जेवण केले आणि त्यानंतर मुले परत थीम पार्क मध्ये गेली.
संध्याकाळी 5 वा. सुमारास पुन्हा परतण्यासाठी थीम पार्क मधून बसमध्ये बसविण्याकरिता मुलांना एकत्र करण्याचे काम शिक्षक करत होते. त्याच वेळी कु. आयुष धर्मेंद्र सिंह हा इयत्ता 8 अ चा विद्यार्थी बाकडयावर बसत असताना चक्कर येऊन जमिनीवर पडल्याचे फुटेज मध्ये दिसून येते. त्यानंतर तात्काळ इमॅजिका व्यवस्थापनाचे डॉक्टर यांनी त्याला मेडीकल सेंटरमध्ये नेऊन प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतू सदर विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला तात्काळ कार्डिअॅक अॅम्बुलन्समधून डॉक्टरांसह नजीकच्या हार्ट स्पेशालिस्ट पार्वती हॉस्पीटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा विद्यार्थी मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापूर येथे रात्री आयुष धर्मेंद्र सिंह याची शवचिकित्सा करण्यात आली.
सदर प्राथमिक शवचिकित्सा अहवालानुसार विद्यार्थ्याचा मृत्यू cause of death cardio respiratory arrest due to acute myocardial infarction नैसर्गिक मृत्यू असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केले आहे.
सदर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्वरित प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री. भागवत डोईफोडे यांना घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी इमॅजिका थीम पार्क येथे जाऊन तेथील व्यवस्थापन व पोलीस आणि डॉक्टर या सर्वांशी चर्चा केली व वस्तुस्थिती जाणून घेतली.
आयुक्तांच्या निर्देशानुसार आजही सहलीला गेलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून तेथे घडलेला घटनाक्रम शिक्षण उपायुक्तांकडून सविस्तर जाणून घेण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शवचिकित्सा अहवाल व पोलीसांकडील तपास अहवाल आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेला वस्तुस्थितीदर्शक अहवाल यांची पडताळणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी प्रशासन विभागास दिले आहेत.