हैडलाइन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, अन्नधान्य व चाऱ्याच्या नियोजनास प्रथम प्राधान्य द्यावे - मंत्री छगन भुजबळ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य द्यावे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात येवला मतदारसंघातील दुष्काळग्रस्त परिस्थिती व विविध विकास कामांची आढावा बैठक येवला संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हिमांशु चव्हाण, पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, संदीप मंडलिक, मोहन शेलार, दत्ता निकम, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भगवान ठोंबरे, देविदास निकम, भागीनाथ पगारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, यंदाच्या वर्षी पावसाची तूट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. अधिग्रहित पाणीस्रोतांचा वापर प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात यावा. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही गतिमान ठेवावी, असेही मंत्री छगन भुजबळ स्पष्ट केले.

दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याने चारा व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. वनविभागाच्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासून त्याला प्राधान्य द्यावे. तसेच मेंढपाळ आणि चराऊ जनावरांना वनविभागाच्या परिसरात चाऱ्यासाठी आवश्यक नियम व परवानग्यांच्या अधीन राहून मुभा देण्याबाबत कार्यवाही करावी. दुष्काळाच्या काळात शेतकरी, पशुपालक आणि मेंढपाळांना दिलासा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

येवला शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. येवला व ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेण्यात आली. तसेच राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि विंचूर-लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील जलजीवन मिशनअंतर्गत रेट्रोफिटिंगच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि कामे पूर्ण करण्यातील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांनी कामांना गती द्यावी. पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.


मतदारसंघातील शेती आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने नादुरुस्त रोहित्रांचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी रोहित्रे नादुरुस्त आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा. यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. लासलगाव येथील घरकुल आवास योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. लासलगाव शहरातील कचरा डेपोसाठी पर्यायी जागा निश्चित करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेऊन याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आल्या.

पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, लासलगाव-विंचूर चौपदरी रस्ता तसेच खेडलेझुंगे येथील काँक्रीट रस्त्याच्या कामांची प्रगती तपासण्यात आली. रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याने संबंधित विभागांनी कामांची सद्यस्थिती तपासून अडचणी दूर कराव्यात आणि नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शिव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या कामांची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित यंत्रणांनी प्रलंबित बाबींची पूर्तता करून कामांना गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. नदी संवर्धनाच्या कामांमध्ये आवश्यक समन्वय राखून नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.


Most Popular News of this Week

बोरिवली आरटीओ आणि मुंबई...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली (MH-47) आणि मुंबई रायडर्स क्लब यांच्या...

मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ...

मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि...

विद्याविहार रेल्वे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या तीन...

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण...

देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. विद्यार्थ्यांचा...