बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या तीन महत्त्वपूर्ण उड्डाणपुलांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य (व्हर्च्युअल) पद्धतीने संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विद्याविहार रेल्वे स्थानकावरील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या ठिकाणी घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार मा. पराग शाह आणि मुंबईच्या महापौर मा. सौ. रितू तावडे उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत लोकार्पण करण्यात आलेल्या तीन उड्डाणपुलांमध्ये विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेवरील पूल, शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेवरील पूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी न्यायालय, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचा समावेश आहे.
विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे घाटकोपर पूर्व व पश्चिम दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल.
यावेळी बोलताना आमदार पराग शाह यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि अभियंते यांचे मनःपूर्वक आभार मानले. सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
“विद्याविहार उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे घाटकोपरमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल. मात्र, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि वाहतूक पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन आमदार पराग शाह यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला आमदार राजहंस सिंह, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष अश्विनी मते, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेवक सुरेश आवळे, नगरसेविका राखीताई जाधव, नगरसेविका अर्चना भालेराव, नगरसेविका निर्मिती कानडे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, दीपकबाबा हांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, जिल्हा महामंत्री भावेश भानुशाली, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत, रवी पूज, मंडळ अध्यक्ष विशाल पूज यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
*विद्याविहार उड्डाणपुलाच्या लोकार्पणामुळे घाटकोपरच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, नागरिकांना अधिक सुलभ व गतिमान प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.