हैडलाइन

सर्व यंत्रणांनी सुयोग्य नियोजन करीत व सुसमन्वय साधत येत्या पावसाळ्यासाठी सज्ज राहावे- महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी

पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांवर मात करण्यासाठी सुयोग्य नियोजन करित आणि आपापसांत सुसमन्वय साधत सर्व यंत्रणांनी अधिक सक्षमपणे सुसज्ज राहावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) विविध यंत्रणांमध्ये योग्य आणि चोख समन्वय राहावा, या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात १० मार्च २०२६ रोजी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 


मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे, महानगरपालिकेचे सह आयुक्त, विविध परिमंडळ आणि विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


त्याचबरोबर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो आणि मोनो रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई पोलीस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट) इत्यादी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  या बैठकीदरम्यान उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी निर्देशित केले की, यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांबरोबर आणि विभागांसोबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे इत्यादींच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या कामांबाबत नियमित समन्वय साधत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच मेट्रो प्रशासनाने देखील त्यांच्या स्तरावर पाणी उपसा करणारे पंप बसवावेत. हे पंप बसवताना प्रत्येक मेट्रोस्थानकाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन व तेथील गरज लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या संख्येने व योग्यता क्षमतेचे पंप बसवावेत असेही निर्देश आयुक्त महोदयांनी दिले. 

भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवताना व त्याबाबत सूचना देताना; संबंधित यंत्रणांना त्यांच्या स्तरावरील कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा, ही बाब लक्षात घेऊन पूर्व सूचना देणे गरजेचे असल्याचेही महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. तसेच, ज्या धोकादायक इमारतींबाबत तेथील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा प्रकरणी सुनिश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार अर्थात 'एसओपी' नुसार कार्यवाही करावी. घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचा संदर्भ नमूद करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सर्व यंत्रणांना त्यांच्या जागेतील होर्डिंग बाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या होर्डिंग धोरणानुसार होर्डिंग असल्याची सुयोग्य खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचसोबत होर्डिंग ज्या ढाच्यावर उभे करण्यात आले आहे, त्या ढाच्याची देखील तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे सह सर्व संबंधित यंत्रणांना दिले.


या बैठकीच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. महेश नार्वेकर यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची आणि सुसज्जतेची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. तर पावसाळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या साथरोगांची संभाव्यता लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांनी उपस्थितांना दिली. 

 बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्याचबरोबर, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारती, त्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती देण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चादेखील बैठकीदरम्यान झाली. याच बैठकीदरम्यान, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मेट्रो, बेस्ट इत्यादींच्या स्तरावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहींची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांद्वारे उपस्थितांना देण्यात आली. 



Most Popular News of this Week

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर...

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून...

खा. संजय दिना पाटील यांच्या...

भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर अनेक समस्या उद्भवत असून प्रवाशांना...

'अरबोरिकल्चर' आणि 'विकास-कामे'...

" विकासाची कामे आणि वृक्ष संवर्धन हे परस्पर विरोधी नाही तर विकास कामासोबतच...

राज्यसभा निवडणुकीसाठी...

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा...

राज्यसभेकडे पार्थ पवारांची...

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग की आवाज बनेंगी डॉ. ज्योति वाघमारेशिवसेना को आम...