‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व पदपथ अधिक सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे प्रभादेवी रेल्वे स्थानक, प्रस्तावित पादचारी पूल (FOB) तसेच परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच बाळाशेट मदुरकर मार्गावरील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार व निर्गमन मार्गाची प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांची पाहणी केली.
‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पूल, प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
विद्यमान पादचारी पुलाच्या प्रस्तावित जिन्याच्या कामाला गती देण्यात यावी. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘पे अॅण्ड यूज’ तत्वावरील प्रसाधनगृहांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने पश्चिम रेल्वेने प्रस्तावित जिन्याचे काम तातडीने पुढे नेण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी पाहणीप्रसंगी दिले. पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करताना तेथील अन्य प्रसाधनगृह हटविण्याची आवश्यकता असल्यास, पर्यायी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पश्चिम रेल्वेकडून प्रस्तावित पादचारी पुलाच्या संरेखनाबाबत व्यवहार्यता तपासून निर्णय घेण्यात यावा तसेच पुलाच्या उतरंड यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधण्याची निर्देश त्यांनी दिले.
रेल्वे परिसर व स्थानक परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यात यावीत, जेणेकरून प्रवाशांना व नागरिकांना स्थानकातून बाहेर पडताना तसेच परिसरात ये-जा करताना अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना दिल्या. गर्दी कमी करण्यासाठी शेअर टॅक्सी थांबा तसेच टॅक्सी प्रवासी उतरण्याच्या ठिकाणांचे योग्य नियोजन करून त्यांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याबाबतचे निर्देशही प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
प्रभादेवी रेल्वे स्थानक व परिसराची सर्वंकष स्वच्छता करण्यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी संपर्क व पोहोच रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (resurfacing) करण्यात यावे. तसेच उत्तर दिशेला नमन मीडटाउन आणि इंडिया बुल्स बिझनेस पार्क यांच्या दरम्यान प्रभादेवी स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबत तसेच रेल्वे स्थानक परिसरात आपला दवाखाना उभारण्याच्या प्रस्तावाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. प्रभादेवी स्थानक परिसरात पादचारी, रेल्वे प्रवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले.
जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रलचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) हिमांशू शर्मा, वरिष्ठ विभागीय अभियंता (मालमत्ता) अभिषेक मित्तल, विभागीय अभियंता (पूल) सुनील कुमार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नरेंद्र साळवी, महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एमआरआयडीसीएल) सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक असित राऊत, वाहतूक पोलिस उपायुक्त धाटे, वरळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.