मुंबई: चेंबूर येथील पोस्टल कॉलनी परिसरात उत्कर्ष धुमाळ नावाच्या तरुणाची तीन सप्टेंबर रोजी जमावाने घरात घुसून हत्या केली होती. तसेच आरोपींनी तरुणाकडून रोख रक्कम, मोबाईल व बाइक देखील चोरली होती. या प्रकरणातील एकूण पाच आरोपींना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या पाच आरोपींपैकी उत्तम कडू (वय- 26) या आरोपीस अटक केली होती. मात्र इतर चार आरोपी मुंबईबाहेर पळून गेले होते. हे आरोपी सराईत असल्याने ते वारंवार आपले ठिकाण बदलून अटक टाळत होते. गुरुवारी एका गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी मुंबईमध्ये आले असून चेंबूर मध्ये एका ठिकाणी लपून बसल्याचे पोलिसांना कळाले. या आरोपींना पोलीस पकडण्यास गेले असता पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. सनी जगताप वय- 26, भगवती शर्मा वय- 29, निशांत गुंजाळ वय- 20 आणि मनीष गुंजाळ वय- 22 अशी या आरोपींची नांवे आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून बाईक हस्तगत केली असून गुन्ह्याचा अधिक तपास करीत असल्याचे चेंबूर वरिष्ठ पोलिस निरीक्षका शालिनी शर्मा यांनी माहिती दिली.