ज्यांच्या मतांवर सत्तेत आले, त्याच शेतकरी आणि लाडक्या बहिणीना सरकार विसरले
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे जनतेशी गद्दारी, कंत्राटदार मित्रांशी यारी!
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांची महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका
मुंबई - निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून गुलाबी जॅकेट धारण करणाऱ्या अर्थमंत्री अजित दादांनी सत्तेत येताच लाडक्या बहिणींशी गद्दारी केली. शेतकरी आणि लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आलेल्या सरकारला आता मात्र त्यांचा विसर पडला आहे अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा . वर्षा गायकवाड यांनी केली.
आजचा अर्थसंकल्पात जुन्याच घोषणा आहेत, नवीन कोणताही कार्यक्रम महायुती सरकारने जनतेसमोर दिलेला नाही, त्यामुळे कृतीहीन आणि दिशाहीन असा हा महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे,अस गायकवाड म्हणाल्या.
निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालून लाडक्या बहिणीची मत मागणारे महायुती सरकार सत्ता येताच २१०० रुपये देण्याच्या आपल्या आश्वासन पासून पळत आहेत. यामुळे गरज सरो आणि वैद्य मरो अशी महायुती सरकारची नियत असल्याचं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
इतके मोठे बहुमत मिळूनही महायुती सरकार मध्ये भ्रष्टाचार आणि आपापसातील भांडणात जनतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आजच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या कंत्राटदार आणि धनाढ्य मित्रांसाठी आहेत. तिजोरी लुटा आणि जनतेला वाऱ्यावर सोडा असेच महायुतीचे धोरण आहे. अर्थसंकल्पात ही आकड्यांचा घोळ आणि शब्दाचा खेळ करण्यात आला पण प्रत्यक्षात मात्र जनतेला वंचित ठेवण्यात आल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.