मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू झालेल्या भव्य ‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’ने पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना थरार, वेग आणि भन्नाट मनोरंजनाची मेजवानी दिली. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील शिंदे व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी पार्क क्लबच्या कार्याध्यक्षा वरदा चुरी, मुंबई महिला क्रिकेटचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वेदक, वियोम फाऊंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर, महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल - स्टार सीसी, श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे.
इनडोअर क्रिकेटमध्ये एका वेळी मैदानावर ८ खेळाडू खेळतात. प्रत्येक जोडीला २ षटके फलंदाजी करावी लागते, तर प्रत्येक खेळाडूला १ षटक गोलंदाजी करणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे, फलंदाज बाद झाल्यास संघाच्या खात्यातून ५ धावा वजा होतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार होताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना मीडिया टिमच्या अंकुश धावरे (१५-५= १० धावा) व किरण महनवर (११-५= ६ धावा) यांनी १६ धावांची पायाभरणी केली त्यावेळी रोहन व ओमकारने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील सिद्धेश कानसे (१२-५= ७ धावा) व निकुंज नाटेकर (७-१०= -३ धावा) यांना फक्त ४ धावांचीच भर घालता आली. यावेळी कुशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले तर प्रसादाने निकुंजला एकदा बाद केले. त्यावेळी धावफलकावर २० धावा झाल्या होत्या. तिसऱ्या जोडीतील अतुल लोके (१२-५= ७ धावा) व अन्वय सावंत (१०-५= ५ धावा) यांनी १२ धावांची भर घातली. यावेळी अजितने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. तर शेवटच्या जोडीतील गणेश पुराणिक (६ धावा) व कर्णधार रोहित नाईक (९-५=४ धावा) यांना आणखी १० धावा केल्याने संघाला ४२ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी श्रेयसने रोहितला एकदा बाद केले. वियोम फाऊंडेशनकडून रोहन, ओमकार, कुश, प्रसाद, अजित आणि श्रेयस यांनी अचूक गोलंदाजी करत नियमित धक्के दिले.
अनिकेत-प्रसाद-ओमकारची फटकेबाजी; वियोमचा विजय
४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वियोम फाऊंडेशनची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्या जोडीने श्रेयस वैद्य (९-१०= -१ धावा) व खुश शहा (११-५= ६ धावा) अश्या ५ धावाच करता आल्या. याचे प्रमुख श्रेय गणेश व सिद्धेश च्या गोलंदाजीला दिले पाहिजे. गणेशने श्रेयसला एकदा तर सिद्धेशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील रोहन गावडे (१५-५= १० धावा) व अजित सेठी (१० धावा) यांनी दमदार भागीदारी करत २० धावा केल्या. यातील रोहनला अन्वयने एकदा बाद केले तर निकुंजला कोणालाही बड करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या जोडीतील अनिकेत माडीये (१८ धावा) व प्रसाद आंब्रे (१४ धावा) यांनी अंकुश व अतुलच्या गोलंदाजीवर तब्बल ३२ धावा कुटल्या व संघाला भक्कम केले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीतील कर्णधार ओमकार पाटोळे (१८-५= १३ धावा) व सुभम गुरव (१२ धावा) यांनी २५ धावांची भागीदारी करत संघाला ८२ धावांपर्यंत नेले आणि ४० धावांनी शानदार विजय मिळवून दिला.
“सराव मिळाला असता तर...” – सुभाष हरचेकर
सामन्यानंतर मीडिया टीमचे व्यवस्थापक सुभाष हरचेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्हाला थोडा अधिक सराव मिळाला असता, तर आम्ही नक्कीच अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. इनडोअर क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असते. प्रत्येक खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची समान संधी मिळते, ही या खेळाची सर्वात मोठी खासियत आहे.”