‘ज्ञान, वैद्यकीय सेवा आणि समाजसमर्पणाची त्रिसूत्री जपणारे डॉ. पुरंदरे महाराष्ट्राची शान’ – मंत्री छगन भुजबळ

ज्येष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, संशोधक, शिक्षक आणि समाजसेवक प्रा. डॉ. चित्तरंजन नरहरी पुरंदरे यांनी पाच दशकांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन आणि समाजसेवेला वाहून घेतलेले जीवन हे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी घडविलेले डॉक्टर, वाचविलेले जीव आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हीच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख असून ज्ञानासाठी शिक्षण, मानवतेसाठी वैद्यकीय सेवा आणि समाजासाठी समर्पण ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री आहे, असे गौरवोद्गार मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

मुंबई येथे प्रा. डॉ. चित्तरंजन नरहरी पुरंदरे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे, अतुल रुईया, डॉ. निखिल पुरंदरे, गीता पुरंदरे यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पुरंदरे कुटुंबाची शंभर वर्षांहून अधिक काळाची समृद्ध वैद्यकीय परंपरा आहे. नायर हॉस्पिटलमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊन डॉ. पुरंदरे यांनी प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख केवळ पदव्या, पुरस्कार किंवा फेलोशिपमध्ये नसून त्यांनी वाचविलेल्या जीवांमध्ये, घडविलेल्या डॉक्टरांमध्ये आणि समाजाला दिलेल्या मानवतेच्या संदेशामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.


डॉ. पुरंदरे यांनी भारत आणि आयर्लंडमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे ४५ वर्षे अध्यापन केले. ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. रुग्णालयाशी त्यांचे अतूट नाते राहिले. हजारो वैद्यकीय विद्यार्थी, शेकडो पदव्युत्तर विद्यार्थी आणि अनेक प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञांना त्यांनी ज्ञान व दिशा दिली. उत्कृष्ट डॉक्टर असणे ही मोठी गोष्ट आहे; मात्र उत्कृष्ट डॉक्टर घडविणारा शिक्षक होणे ही त्याहून मोठी जबाबदारी आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.

महिला आरोग्य आणि मातृआरोग्याच्या क्षेत्रातील डॉ. पुरंदरे यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले की, कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचा पाया हा महिलेच्या आरोग्यात आहे. मातामृत्यू कमी करण्यासाठी त्यांनी देशात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांना चालना दिली. Maternal Mortality Review, Near Miss Review, Emergency Obstetric Care, ANM प्रशिक्षण, कुटुंब नियोजन, सुरक्षित मातृत्व आणि महिला आरोग्य जनजागृती यांसारख्या उपक्रमांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ‘जीव वाचवा’सारख्या अभियानांच्या माध्यमातून वंचित आणि गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वैद्यकीय सेवा ही केवळ उपचार करण्यापुरती मर्यादित नसून ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात आणला, असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

डॉ. पुरंदरे हे उत्कृष्ट चिकित्सक आणि शिक्षकांसोबतच संशोधक म्हणूनही परिचित आहेत. त्यांच्या १४० हून अधिक संशोधनपर लेखांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे. विविध वैद्यकीय पुस्तकांमध्ये त्यांनी योगदान दिले असून अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शेकडो व्याख्याने व सादरीकरणे केली आहेत. गर्भवैद्यकशास्त्र, उच्च-जोखमीची गर्भधारणा आणि स्त्रीरोगशास्त्रातील गुंतागुंतीच्या उपचारपद्धती यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात विकसित केलेली ‘Purandare’s Modified Radical Hysterectomy’ ही पद्धत त्यांच्या संशोधनवृत्तीची आणि वैद्यकीय कौशल्याची साक्ष देणारी असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

International Federation of Gynecology and Obstetrics (FIGO) या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणे हा डॉ. पुरंदरे यांच्या कारकिर्दीतील अत्यंत अभिमानाचा अध्याय असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. एका भारतीय डॉक्टरने जगातील प्रमुख प्रसूती व स्त्रीरोग संस्थेचे नेतृत्व करणे हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून भारतीय वैद्यकीय क्षेत्राचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. FOGSI आणि MOGS यांसारख्या संस्थांच्या नेतृत्वातूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण कार्य केले. भारत सरकार, राज्य सरकारे, WHO, UNICEF तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करत त्यांनी महिला आरोग्याच्या प्रश्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

डॉ. पुरंदरे यांना भारत सरकारचा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार, विविध राष्ट्रीय पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार तसेच देश-विदेशातील प्रतिष्ठित संस्थांच्या फेलोशिप आणि सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे एमेरिटस प्रोफेसर म्हणून गौरविले आहे. डॉ. पुरंदरे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा त्यांच्या वैयक्तिक जीवनप्रवासाचा गौरव करण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्राच्या बदलत्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणारा महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आधुनिक उपचारपद्धतींचा विकास, महिला आरोग्याच्या प्रश्नांतील परिवर्तन, वैद्यकीय शिक्षणातील बदल आणि डॉक्टरांची समाजाप्रती बदलत गेलेली भूमिका यांचे प्रतिबिंब या आत्मचरित्रात पाहायला मिळेल असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.


हे आत्मचरित्र केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर नव्या पिढीतील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत, उच्च शिक्षण घ्यावे, जगभरात संधी मिळवाव्यात; मात्र आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी कसा करता येईल, हे डॉ. पुरंदरे यांच्या जीवनातून शिकावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक सर्जरी, जनुकीय तंत्रज्ञान आणि डिजिटल हेल्थ यांसारख्या नव्या संधी कितीही वाढल्या, तरी वैद्यकीय सेवेच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणुसकी कायम राहिली पाहिजे. डॉ. पुरंदरे यांचे जीवन आपल्याला हाच संदेश देते असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

राखीच्या धाग्यातून उमटली...

रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला मुंबईतील माहीम येथे असणाऱ्या रॉनाल्ड...

राष्ट्रीय क्रीडा...

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय...

REGISTRATIONS BEGIN FOR SEKHON INDIAN AIR FORCE MARATHON 2026

The Indian Air Force (IAF) is conducting the Sekhon Indian Air Force Marathon 2026 (SIM-26) on 04 October 2026.  The event is simultaneously being organised at seven cities across India to...

महापौर बंगल्यातील...

"रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम,...

जैन समाज के साथ नवभारत टाइम्स...

मुंबई में नवभारत टाइम्स द्वारा आयोजित “जैन समाज के साथ विशेष चर्चा सत्र”...

'पादचारी प्रथम’अभियानाच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First)...