राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा दुसरा टप्पा सुरू... सहावा दिवस...
सिन्नर - नाशिक: ओबीसींच्या मतांसाठी भाजप सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करतंय... अरे घरी बसण्याची तुमची वेळ आली आहे मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी सिन्नर येथील जाहीर सभेत केला.
ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहो ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसींचे आरक्षण दिले आहे असे सांगतानाच आज ओबीसींचे १७ टक्के आरक्षण राहिले आहे. तर ९ टक्केच नोकर्यांमध्ये आरक्षण भरलेले आहे अशी माहितीही आमदार छगन भुजबळ यांनी दिली.
सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे. यांना साडेचार वर्षांत सूचलं नाही. परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली. जे परिवर्तन होणार आहे ते सत्तेचे होणार नसून तुम्हा आम्हाला जे दु:ख आहे, अडचणी आहेत त्याबाबतचे परिवर्तन होणार आहे असे महत्त्वपूर्ण विचारही आमदार छगन भुजबळ यांनी मांडले.
राज्य करण्याची यांची लायकी नाही. यांची लवकरच घर वापसी करा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सुरुवात आजपासून नाशिक जिल्हयातून झाली. पहिली सभा सिन्नर येथे प्रचंड गर्दीमध्ये पार पडली. ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांची मुलुखमैदान तोफ नाशिकच्या बालेकिल्ल्यात आजही धडाडली.
खोटी आश्वासने देणार्यांना घालवून नव्याने परिवर्तन घडवूया - जयंतराव पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत सहभागी उध्दव ठाकरे यांनी चार वर्षात दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत.अशा लोकांना घालवून नव्याने परिवर्तन घडवल्याशिवाय गप्प राहायचं नाही असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सिन्नर येथे केले.
फ्रान्सने अत्याधुनिक असे f4k जातीचे विमान ५७० कोटी रुपयांना खरेदी केले. मग साडे सोळाशे कोटीची विमानं का खरेदी करण्यात आली. यामध्ये विशेष काय असा सवालही आमदार जयंतराव पाटील यांनी केला. यावेळी राफेलचा मुद्दा घेवून जयंतराव पाटील यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
राज्यातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. १६ मंत्र्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. स्वतःच्या राज्यातील जनित्रे खरेदी करण्याऐवजी बाहेरच्या देशातून महागडी वीज खरेदी केली आहे. सरकारने बनवलेली पॉवर स्टेशन बंद करण्याचा घाट सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज सरकारने चारवेळा महाग केली. गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे बेकारी वाढण्यासाठी ही कारणे महत्वाची आहेत असेही जयंतराव पाटील म्हणाले.
डोंबिवलीमध्ये भाजप उपाध्यक्षाच्या दुकानामध्ये दंगा करण्यासाठी १७० हत्यारे सापडली. बघा भाजपाचा हा चेहरा आहे. अहो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सामदामदंडभेदाचे आदेश दिल्यामुळे हा प्रकार समोर आलाय असा आरोप करतानाच हा अडवाणींचा पक्ष राहिला नाही तो सभ्य अमित शहांचा हा पक्ष आहे असा टोला आमदार जयंतराव पाटील यांनी लगावला.
देशाच्या चौकीदाराने देश आणि राज्यातील तरुणाईला फसवलं -धनंजय मुंडे
साडेचार वर्षांत प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखांची लूट केली परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीेसटीमधून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले... नोटाबंदीने या देशाचे आर्थिक कंबरडं मोडलं यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही अशा शब्दात सरकारच्या कारभारावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सिन्नर येथील सभेत शरसंधान साधले.
मी खाणार नाही आणि खायला देणार नाही असे सांगून तुम्हाला लुटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मन की बात मध्ये ५६ एपिसोड झाले परंतु ५६ इंचाची छाती कुठे दिसली नाही अशी कोपरखळीही धनंजय मुंडे यांनी केली.
सबका साथ सबका विकास सोडून राममंदिराचा मुद्दा आणला. परंतु हा मुद्दा त्यांना वनवासात जावे लागणार आहे त्यावेळी लक्षात येतो असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. महाराष्ट्राला बरबटून आणि ओरबाडून खाण्याचे काम भाजपने केले असून आपल्या मंत्र्यांची सगळी पापं झाकण्याचे काम केले असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.
नाशिकचा नावलौकिक आदरणीय छगन भुजबळ साहेबांमुळे झाले आहे. अडीच वर्षे भुजबळ साहेबांना छळलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण केले गेले नाही असे सांगताना छगन भुजबळ दिल्लीपासून राज्यातील भाजप नेत्यांना पुरून उरतील कारण राष्ट्रवादीचे सैन्य त्यांच्यासोबत आहे. आम्ही मेलेल्या आईचे दुध प्यायलेलो नाही सर्व शक्तीनिशी पुरुन ऊरु असा इशाराही धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत दिला.
भुजबळांना त्रास देणार्यांना धडा शिकवा - जितेंद्र आव्हाड
भुजबळ साहेबांना दिलेल्या वागणूकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात राफेल ते नथुराम गोडसे आणि भगवा ते भाजपच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. नाशिकच्या समस्या ते बंद करण्यात आलेल्या कारखान्यांमुळे स्थानिक तरुणांचे रोजगार कसे बंद केले यावर भाजपवर शरसंधान साधले.
या सभेत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनीही आपले विचार मांडले. यावेळी शहीद केशव गोसावी यांच्या पत्नी काव्या गोसावी यांना विद्यार्थ्यांनी जमवलेला ५० हजारांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील सभेला ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार हेमंत टकले, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार समीर भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,माजी आमदार जयंत जाधव, नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे, पुणे माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदींसह सिन्नर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.