मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी तसेच झाडांचे आयुर्मान आणि प्रकृतीबाबत परिस्थितीजन्य अभ्यास करण्यासाठी मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड ऑफिस) वनस्पतीशास्राच्या विद्यार्थ्यांकडून झाडांचे सर्वेक्षण करावे. वृक्षसंवर्धन आणि वृक्षांचे आरोग्य याबाबत वृक्षतज्ज्ञांच्या मदतीने माहिती पुस्तिका तयार करून ती सर्व संबंधितांना उपलब्ध करून द्यावी. विविध कारणांनी होणाऱ्या वृक्षतोडीच्या मोबदल्यात लावण्यात येणारी नवीन झाडे मुंबईतच लावावीत. तसेच, झाड पडून दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. यासोबत मुंबईतील झाडांचे वैज्ञानिक वर्गीकरण, सर्वंकष सर्वेक्षण आणि झाडांचे आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा तयार करण्यावर विविध वृक्षतज्ज्ञ, वनस्पतीशास्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची सखोल चर्चा झाली.
मुंबईत दिनांक २२ जून २०२६ ते दिनांक ६ जुलै २०२६ या कालावधीत वाहणाऱ्या अतिवेगवान वाऱ्यामुळे ८३० झाडे पडली. या ८३० झाडांपैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. जेवढी झाडे पडतात त्यापेक्षा जास्त फांद्या पडतात. आतापर्यंत या वर्षात १ हजार २३८ इतक्या फांद्या पडल्या. त्यापैकी ७०९ या खासगी क्षेत्रातील होत्या. या पार्श्वभमीवर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीस ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा जीवनशास्त्रज्ञ प्रा. संजय देशमुख, पर्यावरण अभ्यासक श्रीकांत इंगलकळीकर, वृक्षतज्ज्ञ वैभव राजे, अभिजीत सामंत, दीपक जयंत पाटील, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी आणि वृक्षतज्ज्ञ यांच्या सहभागातून झाडांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सर्वेक्षणाच्या आधारे रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक आणि सुदृढ अशा श्रेणींमध्ये वैज्ञानिक वर्गीकरण करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. तसेच झाडांचे वय, प्रजाती, आरोग्य, संरचनात्मक स्थिती, आयुर्मान आणि परिस्थितीजन्य माहितीचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्यावर भर देण्यात आला.
वृक्षसंवर्धन, वृक्षांचे आरोग्य, योग्य छाटणी, झाडांची निगा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत वृक्षतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली माहिती पुस्तिका तयार करून ती मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकासकामांमुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात लावण्यात येणारी नवीन झाडे शक्यतो मुंबईतच लावावीत, त्यासाठी योग्य प्रजातींची निवड करावी, झाडांना वाढीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी आणि मुळांच्या वाढीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. तसेच महानगरपालिकेचे रस्ते, पर्जन्य जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी आणि उद्यान या विभागांनी वृक्ष संवर्धन, छाटणी याविषयावर एकत्र येवून चर्चा करावी, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
झाडांच्या फांद्या छाटणीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करणे, त्यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करणे, आधुनिक उपकरणांचा वापर करणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच खासगी क्षेत्रातील झाडांच्या छाटणीसाठीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबत चर्चा झाली.
झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम, मातीची उपलब्धता, पाण्याचा निचरा, मुळांना श्वसनासाठी आवश्यक जागा, वाढीवरील परिणाम तसेच झाडे पडण्यामागील विविध कारणांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीमार्फत सखोल संशोधन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. झाड पडल्यास केवळ ते काढून टाकण्याऐवजी त्यामागील मूळ कारणांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यावरही भर देण्यात आला.
मुंबईत विविध ठिकाणी 'बायो-डायव्हर्सिटी झोन' विकसित करून स्थानिक जैवविविधतेला पूरक वृक्षलागवड करण्याची संकल्पना, रस्त्यालगत वृक्षलागवडीसाठी योग्य जागांची निवड, तसेच भविष्यातील हवामान बदलाचा विचार करून वृक्ष व्यवस्थापनाची दीर्घकालीन धोरणे तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच, शहरामध्ये योग्य जागांची निवड करुन बांबू लागवड वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थित तज्ज्ञांनी झाडांच्या संरक्षणासाठी केवळ महानगरपालिकेने काम करुन भागणार नाही. तर, त्यासाठी नागरिकांचा सहभाग, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, मुंबईतील वृक्षांचे संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आणि एका बाजूला झुकलेल्या झाडांना यांत्रिक पद्धतीने टेकू देता येईल का, यावरही अभ्यासकांनी मत मांडले.
कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार
वृक्षांचे संगोपन कसे करावे, जमिनीपासून वर दिसणाऱ्या झाडासह जमिनीखालील मुळांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचा मुद्दा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी मांडला. लवकरच यावरही ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.