हैडलाइन

मुंबईत लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व कोल्हापूर भवन उभारणारः मंत्री श्री. आदित्य ठाकरे


राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी भविष्यवेधी आणि सदा समाजाला पुढे नेण्याचा विचार करुन प्रत्येक कार्य केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही उपयुक्त आहे. हे कार्य आणखी पुढे न्यायचे आहे. मुंबईत राजर्षि शाहू महाराजांचे यथोचित स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारण्यात येईल, असे उद्गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.

मुंबईतील गिरगांवातील खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये उभारण्यात आलेल्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभ’चे लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ, माजी आमदार श्री. मालोजीराजे भोसले यांच्या मुख्य उपस्थितीत आज (दिनांक ०५ मे २०२२) सायंकाळी समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. राजेश क्षीरसागर, खासदार श्री. अनिल देसाई, आमदार श्री. सुनिल शिंदे, डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. प्रशांत गायकवाड, तसेच माजी नगरसेवक श्री. संपत ठाकूर, माजी नगरसेविका श्रीमती अरुंधती दुधवडकर, इतिहास संशोधक श्री. इंद्रजीत सावंत आणि इतर मान्यवर तसेच कोल्हापुरातून राजर्षि शाहू विचार जागर यात्रेसमवेत आलेले मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी आमदार श्री. मालोजीराजे भोसले म्हणाले की, समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षि शाहू महाराज यांची मैत्री होती. या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेणारे वारस म्हणून मी व श्री. आदित्य ठाकरे योगायोगाने येथे उपस्थित आहोत. शाहू महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं. त्यांनी देशालाच नव्हे तर जगाला दिशा देणारा सामाजिक समतेचा पाया रचला, असे श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.


कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षि शाहू स्मृती शताब्दी समिती आणि राजर्षि शाहू सलोखा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर ते मुंबई शाहू विचार जागर यात्रा काढण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये स्थित तत्कालीन ‘पन्हाळा लॉज’ या राजवाड्यात दिनांक ६ मे १९२२ रोजी निधन झाले. अंतिम समयी 'मी जाण्यास तयार आहे, डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो' ही वाक्ये उच्चारल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराजांच्या निधनानंतर ही इमारत करवीर दरबारने १ लाख १० हजारांना फनिबंध या पारसी व्यक्तीला विकली. या राजवाड्याच्या ठिकाणी शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, अशी भास्करराव जाधव यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन केले, मात्र, काही कारणाने अखेरपर्यंत स्मारक उभारले नाही. फनिबंध यांनी पुढे ही जागा एका पारशी ट्रस्टला विकली आणि आता कालांतराने तेथे एडुलाई नामक टोलेजंग इमारत उभी राहिली.

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे यंदा (२०२२) स्मृति शताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून तत्कालीन पन्हाळा लॉज ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारावा, त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न करावेत, या हेतूने काही महिन्यांपूर्वी माजी आमदार श्री. मालोजीराजे भोसले, कोल्हापूरचे पालकमंत्री श्री. सतेज पाटील, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत आदींनी पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज स्मृति स्तंभ उभारणीची कार्यवाही सुरु झाली. 

बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने या स्मृतिस्तंभाची निर्मिती करण्यात आली आहे. स्तंभाची उंची १२ फूट असून त्याचा आराखडा तयार करण्यासाठी कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संस्थेचे सहाय्य घेण्यात आले. हा स्मृतिस्तंभ बेसॉल्ट दगडापासून बनविण्यात आला आहे. त्यावर शाहू महाराजांची प्रतिमा आणि अखेरच्या क्षणी शाहू महाराजांनी उच्चारलेले वाक्य कोरण्यात आले आहे. गिरगाव येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने स्मृतिस्तंभाच्या पायाचे काम करण्यात आले. तर कोल्हापुरात केर्ली या गावी शिल्पकार ओंकार कोळेकर व कलाकार दीपक गवळी यांनी स्तंभ घडवला.

       


Most Popular News of this Week

वाढदिवसाचा स्नेहस्पर्श -...

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) आपल्या...

महामानव भारतरत्न...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ठाणे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

महात्मा फुले जयंती पर मुंबई...

 महात्मा जोतीराव फुले की १९९वीं जयंती के शुभ अवसर पर बहुजन, ग्रामीण एवं...

संसदीय राजनीति में रामदास...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय राज्य...

SAMUDRA SAHAS SAILING EXPEDITION FLAGGED OFF FROM MUMBAI AS PART OF REGIMENT OF...

The Samudra Sahas Sailing Expedition, undertaken by the Regiment of Artillery as part of its bicentenary celebrations, was ceremonially flagged off by Lieutenant General N. S. Sarna, PVSM, AVSM, SM,...