मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' निमित्ताने श्रद्धांजली अर्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्ष दीक्षा कारकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, महानगरपालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अग्निशमन अधिकारी इंद्रजित चढ्ढा, विविध मान्यवर, अधिकारी आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

तसेच, दिनांक १४ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, आजच्या युगात मुंबई अग्निशमन दलापुढील आव्हाने अतिशय वेगळी आहेत. घाटकोपर येथील होर्डिंग कोसळणे आणि मोनोरेलमध्ये प्रवाशी अडकणे यासारख्या घटना त्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य करणे यासाठी मुंबई अग्निशमन दल समर्पित भावनेने कार्यरत असते. त्यांच्या या कार्यात प्रशासन म्हणून जे काही सहाय्य करता येईल ते महानगरपालिका निश्चितपणे करेल. तसेच आपत्तीच्या वेळी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. घटनास्थळी पोहोचणाऱ्या अग्निशमन जवानांना काम करण्यासाठी आवश्यक मोकळीक मिळणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचे सहकार्य, सुरक्षेची योग्य व्यवस्था उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. तांत्रिक अडचणींना सामोरे जात असताना जवानांना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ देणे ही काळाची गरज असल्याचे जोशी यांनी नमूद केले.

मोनोरेल दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांनी अग्निशमन दलाची शिडी दिसताच सुटकेचा निःश्वास सोडला होता. यावरून या दलाबद्दल नागरिकांचा असलेला विश्वास स्पष्ट होतो. इमारतींमधील अग्निसुरक्षेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी ‘रिफ्यूज फ्लोअर’ (इमारतीत आग लागल्यावर इमारतीतील नागरिकांना सुरक्षितपण थांबण्यासाठीचा मजला) ची सुविधा उपलब्ध आहे का, अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित आहे का, तसेच इमारतीचे नियमित परिरक्षण केले जाते का, या बाबींवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘आपदा मित्र’ उपक्रमांतर्गत नागरिकांना प्रशिक्षण दिले जात असून, अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे एकत्रित प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारी वारिक यांनी अग्निप्रतिबंधक यंत्रणा अधिक सुसज्ज होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आदींची माहिती दिली. मुंबईत उंच इमारती आहेत. दाटीवाटीच्या वसाहती आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना उद्भभवल्यानंतर प्रत्यक्ष पोहोचण्याआधीच अग्निशमन जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्यावर मात करीत मुंबई अग्निशमन दल सदैव सज्ज असते, असेही ते म्हणाले. 

विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर म्हणाल्या, सीमेवरील जवान ज्याप्रमाणे देशाचे रक्षण करतो, त्याच भावनेने मुंबई अग्निशमन दलाचे जवान मुंबईकरांच्या रक्षणासाठी सतत तत्पर असतात. आधुनिक यंत्रणांसह मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. दलातील अधिकारी, जवानांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कायम या दलाच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही कारकर यांनी दिली. 

प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले.  मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो, असे सांगून मुंबई अग्निशमन दलाचे उपक्रम, अग्निरक्षक कार्यक्रम, अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन आदींविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी, अग्निशमन मुख्यालय आवारातील वीर स्मृती स्तंभाला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच अग्निशमन दलाने मानवंदना दिली. सन १९४४ च्या घटनेतील आणि त्यानंतर आतापर्यंत मुंबईवर आलेल्या विविध संकंटांना तोंड देताना प्राणांची आहूती देणारे अग्निशमन अधिकारी, जवान यांच्या बलिदानाची आठवण करून देणारी ध्वनिफीत यावेळी ऐकविण्यात आली. 



Most Popular News of this Week

राखीच्या धाग्यातून उमटली...

रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला मुंबईतील माहीम येथे असणाऱ्या रॉनाल्ड...

राष्ट्रीय क्रीडा...

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय...

जैन समाज के साथ नवभारत टाइम्स...

मुंबई में नवभारत टाइम्स द्वारा आयोजित “जैन समाज के साथ विशेष चर्चा सत्र”...

महापौर बंगल्यातील...

"रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम,...

REGISTRATIONS BEGIN FOR SEKHON INDIAN AIR FORCE MARATHON 2026

The Indian Air Force (IAF) is conducting the Sekhon Indian Air Force Marathon 2026 (SIM-26) on 04 October 2026.  The event is simultaneously being organised at seven cities across India to...

'पादचारी प्रथम’अभियानाच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First)...