महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपाचे हीन राजकारण : काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
मुंबई: महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात सलणारे सरकार होते. सरकार स्थापन झाल्यापासून अडीच वर्ष ते पाडण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले, त्यात त्यांना यश आले नव्हते. शेवटी शिवसेनेत फुट पाडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस केले आहे.
भाजपावर टीका करताना राजहंस म्हणाले की, भारतीय जनता पक्ष देशभरातील विरोधी पक्ष संपवायचे राजकरण करत आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सर्व प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकारही अशाच प्रकारे पाडण्यात आले. ज्या राज्यात बहुमत नाही तेथील छोट्या पक्षांना आमिष दाखवून अथवा कारवाईची भिती दाखवून भाजपाने सरकार स्थापन केली आहेत. जनतेच्या मतांवर निवडून न येता तोडफोडीचे राजकारण करायचे व त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जात आहे. लोकशाही, संविधान याला धाब्यावर बसवून सर्व कारभार सुरु आहे. राजकारणात भाजपाने अत्यंत हिन पातळी गाठली असून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यातही त्यांनी सर्वशक्ती पणाला लावली होती. भाजपाचे हे कुटील कारस्थान महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही, असेही राजहंस म्हणाले.