बेस्ट’ला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुमजली इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडी व प्रिमियम बससेवेचे लोकार्पण
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील आवश्यक निधी लवकरच वितरित करणार
मुंबई:- मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट ( बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दुमजली इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाडी व प्रिमियम बससेवेचे लोकार्पण तसेच बेस्ट कॉफी टेबल पुस्तक, बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
एन.सी.पी.ए च्या टाटा थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमास यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त, तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, बेस्ट उपक्रम महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. वाहतूक, विद्युत पुरवठा या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी बेस्टने नेहमीच चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कुठलाही ऋतू, नैसर्गिक आपत्ती असो बेस्ट नागरिकांच्या सेवेत अविरत कार्यरत आहे. कोरोनात देखील अखंड सेवा सुरु होती. बदलत्या काळाप्रमाणे आपल्या सेवेत बदल केल्यामुळे बेस्ट यशस्वीपणे सेवा देत आहे. दुमजली इलेक्ट्रीक वातानुकूलित बस आणि प्रिमियम बससेवा हे बेस्टच्या बदलाचे उदाहरण आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी बेस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. मुंबईच्या वीज वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत आहोत. पदवी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बेस्टने पासेस देण्याची कार्यवाही करावी. बेस्टची सेवा जागतिक दर्जाची होण्यासाठी राज्य शासन सर्व प्रकारची आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.
चांगले रस्ते ही प्रगतीची पहिली पायरी आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गामुळे वाहतूक व्यवस्थेसह अर्थकारणातही मोठे बदल झाले. एमएसआरडीसीचे यामध्ये मोठे योगदान आहे. समृद्धी महामार्गामुळे देखील आता असेच मोठे बदल होणार आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग ठरेल.
*सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर*
केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच बेस्टचाही अमृत महोत्सव हा अपूर्व योग आहे. ‘बेस्ट’ ही खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून बळकट आणि प्रवाशांना सुविधा देणारी असावी. यावर भर देण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक वाहने हेच वाहतूक व्यवस्थेतील पुढील भविष्य असेल. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आहे. याद्वारे पर्यावरणाचे रक्षणही होईल. ‘बेस्ट’चे चलो अँप प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. बेस्टला केंद्र सरकारही नेहमी मदत करेल. रस्तेबांधणीत आता क्रांतिकारक बदल होत असून डबलडेकर, थ्री लेअर ब्रीज यापुढे बांधावे लागतील. पनवेल जंक्शन विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंबई - दिल्ली हायवे देखील उभारण्यात येणार आहे. बंदरांचा विकासही जलद वाहतूकीत महत्वपूर्ण ठरणार आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते वापरात आणले पाहिजे. पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने आणत आहोत. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील महत्त्वाचे इंधन ठरणार असून या सगळ्या पुढाकारामुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, ‘बेस्ट’ ही मुंबईची लाईफ लाईन असून बेस्टशिवाय मुंबईकरांचे जनजीवन शक्यच नाही. मुंबईकर बेस्टचे सदैव ऋणी आहेत. पर्यावरण समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. मात्र बेस्ट पर्यावरणपूरक वाटचाल करत आहे हे विशेष. बेस्ट ही मुंबईकरांचा अभिमान असल्याचेही ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.
महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी प्रास्ताविकात ‘बेस्ट’च्या वाटचालीचा आणि आगामी उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम झाला.