नागपूर. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरकर जनतेचा स्वाभिमान असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर केलेली जहरी टिका ही ३५ लक्ष नागपूर जनतेच्या आत्मसन्माला दुखावणारी बाब आहे. देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची शून्य पात्रता असताना उद्धव ठाकरेंनी ओकलेली गरळ ही त्यांचं खरं कपटी रूप दाखवणारी आहे. नागपूर शहरात होत असलेलं आंदोलन ही केवळ एक चेतावणी असून आपल्या वर्तनात सुधारणा न केल्यास मातोश्रीच्या दारातून देखील निघण्याच्या लायकीचे असणार नाही, असा थेट इशारा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
महाराष्ट्र राज्याचे भूषण उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्हेरॉयटी चौकामध्ये जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहराचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे भूषण आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून ते घेत असलेले लोककल्याणकारी निर्णय यामुळे ते जनतेच्या मनातील ताईत झाले आहेत. नेमकी हिच बाब घरात बसून कारभार करू पाहणा-या उद्धव ठाकरेंना बोचत असावी. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा तिरस्कार करताना मर्यादा न पाळता आलेल्या उद्धव ठाकरेंनी सर्व मर्यादा ओलांटून आपला कपटी चेहरा जनतेला दाखविला आहे. नागपूर शहराचा अभिमान आणि सन्मान असलेल्या श्री. देवेंद्र फडणवीसांवर केलेली टिका ही ३५ लक्ष नागपूरकर जनतेच्या आत्मसन्माला लागलेली ठेच आहे, असे सांगत ३५ लक्ष नागपूरकरांचे प्रतिनिधित्व करणारे हे आंदोलन असल्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम यावेळी म्हणाले.
कमजोर फांदीवर उद्धव ठाकरेंचं घरटं हे आता तुटलेलं आहे. एकेकाळी मर्दांची असलेली बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवसेना तर केव्हाच एकनाथ शिंदेसोबत निघून गेली आहे. आता केवळ उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली नामर्दांची शिवसेना तेवढी उरली आहे. त्याची प्रचिती अनेक बाबींमधून येत असल्याचे देखील ॲड. मेश्राम म्हणाले. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या सामनाचे नेतृत्व कोणतीही पात्रता नसताना उद्धव ठाकरेंनी पत्नीकडे दिली. दुसरीकडे ज्या सोनिया गांधींनी मुलाला देशाचे नेतृत्व देण्यासाठी प्रपंच घातला. तसेच ज्या लालू यादवांनी पात्रता नसताना मुलाला बिहारचा मुख्यमंत्री करण्याचा घाट घातला. त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या मुलाला राज्याचे नेतृत्व देण्यासाठी उद्धव ठाकरे जाउन बसले. हा सर्व नालायकपणा असून हे करताना एकदाही उद्धव ठाकरेंना लाज वाटली नाही का, असाही सवाल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.