हैडलाइन

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेट राखून विजय - डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेट राखून विजय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या सुपर नॉकआउट सामन्यात स्पेस स्पोर्ट्स क्लबने गतविजेत्या रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लबला 6 विकेट राखून पराभूत केले.

चेंबूर येथील आरसीएफ स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मंगळवारी आरबीआय स्पोर्ट्स क्लबचे 154 धावांचे आव्हान स्पेस स्पोर्ट्स क्लबने 17.3 षटकांत 4 विकेटच्या बदल्यात पार केले.

सलामीवीर रोहन गज्जरने (20 चेंडूंत 39 धावा) आदित्य परबसह (19 धावा) झटपट 61 धावांची सलामी देत स्पेस स्पोर्ट्स क्लबच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. आदित्य आणि वनडाउन ओंकार खटपे (0) एकाच धावसंख्येवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावरील अनिरुद्धही (16 धावा) मोठी खेळी करू शकला नाही. मात्र, मधल्या फळीतील कुशल दवणे (31 चेंडूंत नाबाद 42 धावा) आणि पुनीत त्रिपाठीने (19 चेंडूंत नाबाद 32) पाचव्या विकेटसाठी 61 धावांची नाबाद भागीदारी करताना 15 चेंडू राखून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरबीआयच्या जय नायकने (3 विकेट) प्रभावी गोलंदाजी केली तरी त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

तत्पूर्वी, स्पेस स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून आरबीआय स्पोर्ट्स क्लबला प्रथम फरलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर सुमीत घाडीगावकरसह (31 चेंडूंत 57 धावा) आणि कर्णधार अमेय दांडेकरच्या (32 चेंडूंत 52 धावा) फटकेबाजीनंतरही त्यांचा डाव 19.4 षटकांत 154 धावांवर आटोपला. सुमीत आणि अमेयला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. आरबीआय स्पोर्ट्स क्लबकडून विकास सिंग, कर्णधार वैभव माळी आणि रोहन गुज्जरने प्रत्येकी दोन विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले.

दुसर्‍या सामन्यात, अकाउंटंट जनरल (एल अँड आर) स्पोर्ट्स क्लबने बालाभाई नानावटी हॉस्पिटल एससीवर 4 विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, नानावटी हॉस्पिटलने 20 षटकांत 9 बाद 166 धावा केल्या. अकाउंटंट जनरलने 19.1 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात लक्ष्य पार केले.

आरसीएफचे सीएमडी एस. सी. मुदगेरीकर यांच्यासह तांत्रिक डायरेक्टर रितु गोस्वामी, फायनान्स डायरेक्टर नझत जे. शेख, डायरेक्टर मार्केटिंग निरंजन सोनक तसेच ईडी जे. पी. शर्मा आणि गोपालन शेशाद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन समारंभ झाला. यावेळी सीएमडी मुदगेरीकर यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना सर्वोत्तम सांघिक भावनेने खेळण्याचे आवाहन केले.

संक्षिप्त धावफलक : रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब - 19.4 षटकांत सर्वबाद 154(सुमीत घाडीगावकर 57, अमेय दांडेकर 52, विकास सिंग 37-2, रोहन गुज्जर 33-2, वैभव माळी 30-2) वि. स्पेस स्पोर्ट्स क्लब - 17.3 षटकांत 4 बाद 155(रोहन गुज्जर 39, कुशल दवणे नाबाद 43, पुनीत त्रिपाठी नाबाद 32, जय नायक 19-3). निकाल: स्पेस स्पोर्ट्स क्लब 6 विकेट राखून विजयी.

बालाभाई नानावटी हॉस्पिटल एससी - 20 षटकांत 9 बाद 166(दिव्यम शहा 68 (46 चेंडू, 6 चौकार 6 षटकार), ओंकार जाधव 57 (30 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार); इम्तियाज अहमद 3/23, यश कदम 2/25, प्रांकेश जनरल 2/25) वि. अकाउंटंट जनरल (एल अँड आर) स्पोर्ट्स क्लब - 19.1 षटकांत 6 बाद 170(वरुण लवंदे 68 (29 चेंडू, 7 चौकार, 5 षटकार), अंशुल 32 (30 चेंडू, 1 चौकार,2 षटकार); गरव जैन 2/9, ओंकार जाधव 2/32). निकाल: अकाउंटंट जनरल एससी 4 विकेट राखून विजयी.


Most Popular News of this Week

मेट्रो स्टेशन ला स्वातंत्र्य...

मेट्रो स्टेशन ला स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य नाव देण्याची...