बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी विविध नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, सोयी-सुविधा आणि श्रीगणेशमूर्ती विसर्जनाबाबत केलेल्या विविध उपाययोजनांची देशभरातील १३ वरिष्ठ वरिष्ठ महसुली अधिकारी (आयआरएस) आणि तज्ज्ञांच्या अभ्यास पथकाने पाहणी केली. श्रीगणेशोत्सव विसर्जनासाठी करण्यात येणारे प्रत्यक्ष नियोजन, समन्वय व व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अभ्यास करत या चोख नियोजनासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणांचे कौतुक केले.
‘सार्वजनिक धोरण व्यवस्थापन कार्यक्रम’ (Public Policy Management Programme - PGPEx-PPM) अंतर्गत भव्य सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रत्यक्ष नियोजन, नागरी प्रशासन (Urban Governance) आणि क्षेत्रीय अंमलबजावणी याविषयी व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबई यांच्याकडून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील श्रीगणेशोत्सव ही देशविदेशातील भाविक, नागरिक, अभ्यासकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी यानिमित्ताने उत्तमोत्तम सोयी-सुविधांसह प्रभावी पूर्वतयारी केली जाते. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात यंदाही अत्यंत चोख नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी या अभ्यास पथकाने स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे भेट दिली.
सहाय्यक आयुक्त (डी विभाग) श्री. संतोष साळुंके यांनी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे विसर्जनाकरिता महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेली प्रत्यक्ष व्यवस्था, नियंत्रण कक्ष व विविध नागरी उपाययोजनांची संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन माहिती करून दिली. मुंबईत सर्वाधिक श्रीगणेशमूर्ती विसर्जन हे स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे होते. श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येथे २० मनोरे, १२ कृत्रिम तलाव, ९० प्रसाधनगृहे, २२ तराफे, ११९४ जर्मन/स्टील प्लेट, २२ निर्माल्य कलश, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४८फ्लड लाईट, ११ सर्च लाईट, ३ रुग्णवाहिका आणि १ हजार मनुष्यबळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सज्ज ठेवण्यात आले आहेत.
महानगरपालिकेकडून या उत्सवासाठी साधारण ३ महिने आधीपासून पूर्वतयारी केली जाते. स्वराज्यभूमीवरील वाळूमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या गाड्या अडकू नयेत म्हणून सुमारे १,२०० लोखंडी प्लेट्स (Steel Plates) टाकण्यात आल्या आहेत. ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम तलाव, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती शौचालये, सुसज्ज आरोग्य कक्ष, जीवरक्षक (Life Guards), आणि अहोरात्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यासह अन्य विविध कार्यवाहीची माहिती साळुंके यांनी अभ्यास पथकास दिली.
प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) श्रीमती रश्मी लोखंडे यांनी बृहन्मुंबईतील सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि श्रीगणेश विसर्जन व्यवस्थापन याविषयी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष कार्यपद्धती, विविध शासकीय यंत्रणांमधील आंतरसंस्थात्मक समन्वय (Inter-agency coordination), भाविकांच्या अथांग जनसागराचे नियोजन (Crowd Management), वाहतूक नियमन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग याविषयी सविस्तर माहिती दिली.
याचबरोबर पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना, गर्दीचे सूक्ष्म नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आणि गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी केलेली खबरदारी याविषयी सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी माहिती दिली.
लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, आरोग्य व नागरी सोयी-सुविधांची काळजी घेत शांततेत आणि शिस्तीत विसर्जन सोहळा पार पाडणे, हा सार्वजनिक व्यवस्थापनाचा व नागरी प्रशासनाचा एक अत्यंत प्रभावी आणि आदर्श वस्तुपाठ असल्याचे अभ्यास पथकातील अधिकाऱ्यांनी नमूद केले. विविध यंत्रणांमधील समन्वय, चोख नियोजन आणि अत्याधुनिक यंत्रणेमुळेच हा भव्य सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडत असल्याचे सांगत सहभागी अधिकारी व आयआयएम मुंबईच्या प्राध्यापकांनी महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
या अभ्यास पथकात प्रधान आयकर आयुक्त (वित्त मंत्रालय, भारत सरकार) सी. चंद्रकांता, सह आयुक्त (वित्त मंत्रालय, भारत सरकार) हरिता नेनावत, सह आयुक्त (वित्त मंत्रालय, भारत सरकार) जितेश कुमार जैन, वरिष्ठ उपसंचालक (पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार) कुलदीप शर्मा, सह आयुक्त (महसूल विभाग, भारत सरकार) वैभव कुमार सिंग, संचालक (एनडीएमसी, गृह मंत्रालय, भारत सरकार) क्रिशन कुमार, संचालक (माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार) अंशुमान मिश्रा, जिल्हा न्यायाधीश (जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे) सोनल सुनीलजीत पाटील, व्यवस्थापक (इंडियन बँक) स्नेहल पांडुरंग निमसे, व्यवस्थापकीय संचालक (निर्मिती प्रोमॅक कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड) राहुल वसंत वैद्य, उपाध्यक्ष (जनरेशन इंडिया फाउंडेशन) गौरांग दयाल, वरिष्ठ सल्लागार (कौटिल्य वोरोल्ड) आदित्य अशोक, प्रकल्प संचालक (अर्न्स्ट अँड यंग एलएलपी) सिद्धार्थ चौधरी यांचा समावेश होता. तसेच, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.