हैडलाइन

मुंबईतील समुद्र स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि 'द ओशन क्लीनअप' यांच्यात सामंजस्य करार

मुंबईच्या सागरी किनारपट्टीचे प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) या संस्थे दरम्यान आज (दिनांक १८ नोव्‍हेंबर २०२६) सामंजस्य करार (Mou) करण्यात आला आहे. या सहकार्याच्या माध्यमातून समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक कचरा आणि अन्य घनकचरा रोखणे, त्याचे संकलन करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सागरी प्रदूषणावर प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांचे पर्यावरणीय संतुलन राखणे, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्वच्छ व सुंदर मुंबईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर  संजय घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उप आयुक्त (पायाभूत सुविधा ) गिरीश निकम आणि 'द ओशन क्लीनअप'चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बोयन स्लॅट यांनी या सामंजस्‍य करारावर सह्या केल्या. नेदरलॅंड दूतावासाचे महावाणिज्‍यदूत  नबील तौवाती, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) मेहुल पेंटर यांच्‍यासह पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभगााचे अभियंता - अधिकारी उपस्थित होते. 


प्लॅस्टिक प्रदूषणापासून महासागरांना मुक्त करण्यासाठी 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) ही आंतरराष्‍ट्रीय संस्‍था कार्यरत आहे. या संस्‍थेने मालाड खाडीतील रामचंद्र नाला व ट्रॉम्‍बे खाडीतील सुभाष नगर नाला येथे ट्रॅश इंटरसेप्‍टर प्रणाली यशस्‍वीपणे स्‍थापित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करून हटविण्यात आला आहे. यात ट्रॉम्बे खाडीतील १०२ मेट्रिक टन, तर मालाड खाडीतील १७.५ मेट्रिक टन कचऱ्याचा समावेश आहे. मुंबईमध्ये ‘प्लास्टिक फिशर’ (Plastic Fischer) आणि ‘युनायटेड वे मुंबई’ (United Way Mumbai) या स्थानिक अंमलबजावणी भागीदार संस्थांचे 'द ओशन क्लीनअप' यांना सहकार्य लाभले आहे. 


आज करण्‍यात आलेल्‍या सामंजस्य करारांतर्गत प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ (Interceptor) यंत्रणा अतिरिक्त नऊ ठिकाणी तैनात केली जाणार आहे. त्‍यात दादर - धारावी नाला, पिरामल नाला, गजधरबंध नाला, मिठी नदी, ट्रॉम्‍बे खाडी, कला नगर नाला, राजेंद्र नगर नाला, माहुल नाला व मालवणी नाला या ठिकाणांचा समावेश आहे. प्लास्टिक कचरा अरबी समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दिशेने हा सामंजस्‍य करार एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


महापौर  रितू तावडे म्‍हणाल्‍या की, मुंबईची किनारपट्टी, नद्या आणि सागरी किनारा स्‍वच्‍छ व सुरक्षित राखण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिकेने स्‍वतः १४ महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणी कचरा प्रतिबंधक अडथळे (ट्रॅश बूम्‍स) उभारले आहेत. तसेच दहिसर, पोईसर, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्‍जीवन प्रकल्‍प सुरु आहेत. लव्‍हग्रोव्‍ह व इर्ला येथे 'बॅक रेक स्‍क्रीन' बसविले आहेत. तसेच ११ ठिकाणी ट्रॅश नेट बसविण्‍यात आले आहेत. विविध उपाक्रमांद्वारे जलप्रवाहातून समुद्रात जाणारा घनकचरा रोखण्‍यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहे. त्‍यास जोड म्‍हणून विविध स्‍वयंसेवी संस्‍था आणि सामाजिक दायित्‍व निधीतून (CSR Fund) भागीदार संस्‍था हातभार लावत आहेत. ‘द ओशन क्‍लीनअप’ या आंतरराष्‍ट्रीय संस्‍थेसमवेतच्‍या सामंजस्‍य करारामुळे आणखी ९ ठिकाणी इंटरसेप्‍टर प्रणाली कार्यान्वित होणार आहेत. ज्‍यामुळे समुद्रात प्रवेश करणारा प्‍लास्टिक व इतर तरंगता कचरा प्रभावीपणे रोखला जाईल. 


पर्यावरण संरक्षणाच्‍या या व्‍यापक मोहिमेत स्‍वयंसेवी संस्‍था, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्‍व (CSR) भागीदार आणि नागरिकांचा वाढता सहभाग अत्‍यंत सकारात्‍मक व स्‍वागतार्ह असून, त्‍यांच्‍या सामुहिक सहकार्यामुळे मुंबई अधिक स्‍वच्‍छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्‍याच्‍या प्रयत्‍नांना निश्चितच बळ मिळेल. स्‍वच्‍छ महानगर ठेवण्‍याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. मुंबईकर नागरिकांना आवाहन करते की, कृपया कचरा नाल्‍यांमध्‍ये, नद्यांमध्‍ये किंवा समुद्र किनाऱयावर टाकू नये. स्‍वच्‍छ मुंबई - प्रदूषणमुक्‍त समुद्र हे आपले सामुहिक ध्‍येय आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका, मुंबईकर नागरिक, स्‍वयंसेवी संस्‍था आणि उद्योग क्षेत्र यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नातून आपण हे निश्चितच साध्‍य करु, असा विश्‍वास महापौर रितू तावडे यांनी व्‍यक्‍त केला. 


महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या, मुंबईचा समुद्रकिनारा, नद्या आणि सागरी परिसंस्था स्वच्छ व सुरक्षित राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १४ महत्त्वाच्या ठिकाणी कचरा अडविणारी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित केली आहे. ‘द ओशन क्लीनअप’ या संस्थेसमवेतच्‍या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आणखी नऊ ठिकाणी ‘इंटरसेप्टर’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. महानगरपालिकेची सक्षम कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट व्यवस्थापन यंत्रणा आणि ‘द ओशन क्लीनअप’ संस्थेचे जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य यांचा प्रभावी समन्वय साधल्यामुळे प्लास्टिक तसेच पाण्यावर तरंगणारा कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळणार आहे. सागरी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि मुंबईच्या किनारपट्टीवरील पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.


Most Popular News of this Week

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

लातूर जिल्हा बँकेत सहकार...

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...