राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बृहन्मुंबई क्षेत्रात विविध ठिकाणी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत मुंबई शहर आणि उपनगरांमधील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा; पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे; मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार अमित साटम, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अतुल भातखळकर, आमदार अमीन पटेल, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संबंधित परिमंडळ उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आदी सहभागी झाले. तसेच, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेविषयक विचारांना अभिवादन करण्यासोबतच स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मणीभवन परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सहभाग नोंदवला.
जुहू समुद्रकिनारा परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत आमदार अमित साटम यांनी भाग घेतला. पी (पूर्व) विभागातील खोडियाल माता मंदिर, धन्जीवाडी येथील स्वच्छता उपक्रमात आमदार अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला. तर, वांद्रे येथील बँडस्टॅंड परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत अभिनेता महेश मांजरेकर सहभागी झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे सहायक आयुक्त आदी सहभागी होते.
दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे या नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व करीत असलेल्या घाटकोपर (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक १३२ मधील विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या. या मोहिमेदरम्यान स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी महापौर रितू तावडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसरातील रस्त्याची स्वच्छता केली आणि नागरिकांना आपला परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले.