हैडलाइन

मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा कळस, तासभर धीमी लोकल नाही, तीन जलद आणि एसी लोकल धावत राहिल्या! खा.संजय पाटील यांचा संताप

मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी पुन्हा एकदा मुंबईकर प्रवाशांना बसला. मुलुंड रेल्वे स्थानकावर दुपारच्या वेळी धीम्या मार्गावर तब्बल तासभर एकही धीमी लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. विशेष म्हणजे धीमी लोकलची वाट पाहत प्रवासी गर्दीने अक्षरशः हैराण झालेले असताना याच काळात धीम्या मार्गावर तीन जलद गाड्या आणि एक वातानुकूलित लोकल धावत गेल्याने रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या गोंधळामुळे मुलुंडसह भांडुप स्थानकावरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत एक महाविद्यालयीन तरुणीचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्मवर पडल्याची घटना घडली. मात्र एखादी मोठी दुर्घटना घडण्याची रेल्वे प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. 

मुलुंड रेल्वे स्थानकावर सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. उद्घोषणांमधून तांत्रिक कारणामुळे धीम्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती त्यापेक्षा कितीतरी गंभीर होती. दुपारी सव्वा एकच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर धीमी लोकल आल्यानंतर गर्दीमुळे अनेक प्रवाशांना गाडीत चढताही आले नाही. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत धीम्या मार्गावर जलद लोकल धावली. धीम्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाडीचा कोणताही उपयोग नसल्याने अनेकांनी ती सोडून दिली. त्यानंतर वातानुकूलित लोकल आणि पुन्हा जलद लोकल धावली, मात्र धीमी लोकलची प्रतीक्षा करणारे हजारो प्रवासी प्लॅटफॉर्मवरच अडकून पडले. एका मागोमाग जलद आणि वातानुकूलित गाड्या धावत असताना धीमी लोकल मात्र गायब असल्याचे चित्र होते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी प्रत्येक मिनिटाला वाढत गेली. भांडुप स्थानकावरही परिस्थिती अधिक गंभीर झाली असून संपूर्ण प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून गेल्याचे चित्र होते. ऑक्टोबरच्या उकाड्यात घामाने अक्षरशः डबडबलेल्या प्रवाशांना लोकलची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. रेल्वे प्रशासनाकडून दहा-पंधरा मिनिटांच्या विलंबाची उद्घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात प्रवाशांना त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ ताटकळत राहावे लागले. या गोंधळात एका महाविद्यालयीन तरुणीने घाईघाईने लोकल पकडली. गाडीत चढल्यानंतर ती जलद लोकल असल्याचे तिच्या लक्षात आले. खाली उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र गर्दीच्या अशा परिस्थितीत एखादा प्रवासी रेल्वे रुळावर पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 


विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत शाळा-महाविद्यालये सुटत असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने स्थानकांवर येतात. त्याचवेळी दुसऱ्या पाळीत कामावर जाणारे कर्मचारीही प्रवासासाठी रेल्वे स्थानकांवर दाखल होतात. त्यामुळे या वेळेत प्रवाशांची संख्या मोठी असते. अशा वेळी नियमित धीम्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठा खंड पडणे आणि त्याच मार्गावर जलद व वातानुकूलित गाड्या सोडणे हे प्रवाशांच्या अडचणीमध्ये भर घालणारे ठरते. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास तब्बल तासभराच्या प्रतीक्षेनंतर धीमी लोकल प्लॅटफॉर्मवर आली आणि गर्दीतील अनेक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडत गाडी पकडली. ठरलेल्या वेळेत कार्यालयात, शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर कामासाठी पोहोचण्याची प्रवाशांची धडपड असताना रेल्वेच्या विलंबामुळे त्यांचे वेळापत्रक कोलमडते, आर्थिक नुकसान होते आणि महत्त्वाच्या कामांवर परिणाम होतो.

रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांचा प्रश्नही गंभीर आहे. कोणती गाडी येत आहे, ती जलद आहे की धीमी, कुठे जाणार आहे, याची माहिती उद्घोषणांमधून दिली जात असली तरी अनेक ठिकाणी उद्घोषणा स्पष्ट ऐकू येत नाहीत. एकाच वेळी अनेक गाड्यांची ये-जा सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना योग्य गाडीची माहिती वेळेत मिळत नाही आणि घाईघाईत गाडी पकडण्याच्या प्रयत्नात अपघाताचा धोका वाढतो.

या संपूर्ण परिस्थितीवर ईशान्य मुंबईचे खासदार व केंद्रीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य संजय दिना पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शाळा, महाविद्यालये सुटतात तसेच दुसऱ्या पाळीत कामावर जाणारे कर्मचारी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर येतात. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ठाण्याहून विशेष धीम्या लोकल सोडण्यात याव्यात, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयातून घरी जाताना अशा प्रकारच्या गर्दीला आणि अनिश्चित प्रवासाला सामोरे जावे लागू नये, याची रेल्वे प्रशासनाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर असून, गर्दीच्या वेळेत पुरेशा लोकल उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मध्य रेल्वेने आपल्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक तातडीने सुधारावे, दुपारच्या वेळेतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लोकल फेऱ्यांचे योग्य नियोजन करावे आणि उद्घोषणा व्यवस्था अधिक स्पष्ट व प्रभावी करावी, अशी मागणीही खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ तांत्रिक कारण सांगून विलंबाचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...