हैडलाइन

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रतिपादन

देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासोबतच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. अशा देशाची आणि पिढ्यांची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांपैकीच ५० गुणवंत शिक्षकांना ‘महापौर शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा गौरव करताना आनंद होत आहे. या शिक्षकांचा सन्मान म्हणजे उद्याच्या सशक्त, स्वाभिमानी आणि विकसित भारताचा पाया रचणाऱ्या हातांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले. तसेच, पुढील वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी रक्कम ११ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२५-२६’ वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी महापौर तावडे बोलत होत्या.  


उप महापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिनी जाधव, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेविका राजेश्री भाटणकर, नगरसेविका मेहजाबीन अतीक अहमद खान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रेय वारे गुरुजी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आज जग अफाट वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, कॉम्प्युटर व सोशल मीडियाचे अल्गोरिदम आणि माहितीचा महापूर आज मुलांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहे. तंत्रज्ञान जगातल्या सर्व पुस्तकांतील माहिती सेकंदात देईल, पण एका हताश बालकाच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्याच्या पाठीवर 'तू हे करू शकतोस' असा विश्वासाचा हात जगातील कोणताही अल्गोरिदम कधीच ठेवू शकणार नाही. मशीन माहिती देऊ शकते, पण जीवनाला विवेक आणि माणुसकी देण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकाच्याच हातात आहे, असे त्या म्हणाल्या.

विकसित भारत २०४७ म्हणजेच स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षातील अत्याधुनिक भारताचे भविष्य घडवणारा आजचा शिक्षक हा केवळ परीक्षा घेणारा किंवा पाठांतर करवून घेणारा असून चालणारा नाही. तर तो विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पंख लावणारा असला पाहिजे, अशी अपेक्षाही महापौर तावडे यांनी व्यक्त केली.


सोबतच शिक्षण म्हणजे फक्त गुणांची चढाओढ नाही. मुलांचे मानसिक आरोग्य आणि आनंद देखील टिकले पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार असण्याबरोबर तो आनंदी, तणावमुक्त व संवेदनशील नागरिक, माणूस कसा घडेन, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही महापौर यानी केले.

यावेळी महापौर रितू तावडे यांनी आपण शिक्षण समिती अध्यक्ष असताना राबविलेल्या उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला. 

उप महापौर संजय घाडी म्हणाले, शिक्षणामुळे, शिक्षकांमुळे गाव, शहर, देश घडत असतो. मुंबई महानगराच्या जडणघडणीतही बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा तितकाच मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. घाडी यांनी भाषणातून शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. 

शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुरू सोबतच पालकही असतो. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) खूप प्रगत असली तरी ही बुद्धिमत्ता शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनात शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी मुलाखती घेताना आलेले अनुभव यावेळी शिरवडकर यांनी सांगितले. मुलाखतीदरम्यान शिक्षकांनी सादर केलेले उपक्रम, विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिनी जाधव म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील शिक्षण पद्धती आणि शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी खूप परिश्रम घेतात. यामुळे आज विविध क्षेत्रात महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले आहेत, असे त्या म्हणाल्या.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती घेताना शिक्षक राबवित असलेले उपक्रम खूप कौतुकास्पद असल्याचे जाणवले. शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिका शाळेतील शिक्षक खूप परिश्रम घेतात. इतर शिक्षकांनी देखील यातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे) इतके पुरस्कार मानधन दिले जाते. सोहळ्यात शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी मानधन रकमेत वाढ करावी, अशी मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली. 

मनोगत व्यक्त करताना महापौर रितू तावडे यांनी पुढील वर्षांपासून पुरस्कार रक्कम ११ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात येईल, अशी घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. 

सन २०२५-२६ च्या महापौर पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक आणि विशेष शिक्षक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यातील ५० प्रयोगशील शिक्षकांना आज सन्मानित करण्यात आले. 


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...