कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘Seva First Innovation Challenge 2026’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत येथील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील ३९ उमेदवारांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.
या सादरीकरण सत्रात कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, संशोधन आणि नाविन्यपूर्ण विकास अशा विविध क्षेत्रांशी निगडित प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले. यासाठी शासकीय व तांत्रिक क्षेत्रातील ९ तज्ज्ञ परीक्षकांचे मंडळ नियुक्त करण्यात आले होते. या परीक्षणातून सर्वोत्तम ठरणाऱ्या संकल्पनांची निवड करून संबंधित उमेदवारांना शासनातर्फे गौरविण्यात व प्रोत्साहन दिले जाणार आहे.
परीक्षक म्हणून महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, कृषी उपसंचालक प्रतीक पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. एम. शिंदे, उद्योग अधिकारी संकेत कदम, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव, डीआयटी प्रतिनिधी प्रतीक पेठकर, प्रा. चंद्रशेखर जाधव, फिनोलेक्स कॉलेजचे प्रा. एम. एन. तगारे तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. श्रीकृष्ण मस्के यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त दत्ता दि. चव्हाण यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर अकोजवार, आयोजक प्रा. चंद्रशेखर जाधव, विद्यार्थी स्वयंसेवक आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास अधिकारी मो. ए. दुधाळ, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी श्री. मनोज लोखंडे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.