पालघर दि ५ नोव्हेंबर २०२६: नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ९ हजार ८०० पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ५५ कोटी ८१ लाख १४ हजार २२८ रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. कर्जमुक्तीच्या या मदतीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ अखेर कर्जाची परतफेड करू न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची तरतूद आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, प्रादेशिक ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या पात्र पीककर्जासह प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जालाही या योजनेचा लाभ लागू आहे.
पालघर जिल्ह्यात योजनेअंतर्गत यापूर्वी १० हजार ४८४ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी ४७९ पात्र शेतकऱ्यांची दुसरी, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी २०६ पात्र शेतकऱ्यांची तिसरी, तर २२ ऑक्टोबर २०२६ रोजी १ हजार १९१ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या यादीतील ५ हजार १६९ शेतकऱ्यांना २९ कोटी २० लाख ४३ हजार ४ रुपये, दुसऱ्या यादीतील २ हजार ६१५ शेतकऱ्यांना १४ कोटी ८१ लाख ७१ हजार २२४ रुपये, तिसऱ्या यादीतील ५२६ शेतकऱ्यांना ३ कोटी ३५ लाख रुपये, तर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी चौथ्या टप्प्यातील १ हजार ४९० शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ९ हजार ८०० शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५५ कोटी ८१ लाख १४ हजार २२८ रुपयांची रक्कम जमा झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.