गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे पारंपरिक आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. सानपाडा सेक्टर १६ येथील गुनीना मैदानावर उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते सपत्नीक गुढी उभारण्यात आली. ‘संयुक्त कुटुंब’चा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून जागतिक शांततेची प्रार्थनाही व्यक्त करण्यात आली.
सकाळी लवकरपासूनच नागरिकांनी मैदानावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंत्रोच्चारात गुढी उभारल्यानंतर सामूहिकरित्या पसायदान गायले गेले. त्यानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले.
ढोलताशा पथकांच्या दमदार गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालबद्ध ठेक्यावर तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैदान दणाणून सोडले. यानंतर महिलांच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या देखण्या हालचालींनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक पोशाखातील महिलांनी सुसंगत तालावर केलेले लेझीम सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरले. त्याचबरोबर शिवकालीन परंपरेची आठवण करून देणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात ऐतिहासिक रंग भरला.
उत्सवात लहान मुलं, तरुण आणि महिलांनी संत, महापुरुष तसेच विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. विशेषतः लहान मुलांच्या पारंपरिक वेशभूषेतील रॅम्प वॉकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, आकर्षक पोशाख आणि टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा रॅम्प वॉक कार्यक्रमातील ठळक क्षण ठरला.
याशिवाय मैदानावर शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी आणि महिलांच्या लेझीम सादरीकरणाने नागरिकांची मनं जिंकली, तर सोहळ्यास्थळी साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी ने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिला, पुरुष आणि बालकांचा आयोजकांच्या वतीने रोख रक्कम, भेटवस्तू व गिफ्ट व्हाऊचर्स देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक निशांत करसन भगत, नगरसेविका प्रीती संदीप भगत व समाजसेवक संदीप करसन भगत यांच्या संयोजनाखाली करण्यात आले.
विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. ‘संयुक्त कुटुंब’ ही संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत असल्याचे उपमहापौर दशरथ भगत यांनी नमूद केले. आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे त्या-त्या देशांचे मानव, साधन संसाधन व वैश्विक शांततेचे नुकसान होत आहे, 'वसुदेव कुटुंबकम' ही भारतीयांची शिकवण जगासाठी अनुकरणीय आहे अशी भावना उपमहापौर भगत यांनी व्यक्त केली.
उपक्रमाच्या कार्यवाहक माजी नगरसेविका श्रीमती. फशीबाई करसन भगत, सौ.वैजयंती दशरथ भगत, सौ. रुपाली निशांत भगत यांच्या सह कार्यक्रमास ड प्रभाग समिती अध्यक्षा शैला जगदीश पाटील, नगरसेविका शिल्पा राजेश ठाकूर, नगरसेवक भाऊ भापकर, परिवहन समिती सदस्य राजेश राय हे उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यास सोनखार (पामबीच ) जेष्ठ नागरिक सेवा समितीचे सदस्य व सोनखार कराओके कला मंच यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोलताशांचा गजर, महिलांचे लेझीम आणि अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीतील पेहरावातील रॅम्प वॉक यामुळे गुढीपाडव्याचा उत्सव यंदा विशेष रंगतदार ठरला असून परिसरात नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.