हैडलाइन

पिण्याच्या पाण्याच्या संरक्षणासाठी अतिरिक्त उपाययोजना लागू, पाण्याचा गैरवापर / अपव्‍यय आढळल्यास कारवाई

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने उपलब्‍ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर वापरावरही आवश्यक मर्यादा घालण्‍यात आल्या आहेत. त्‍यानुसार, सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्‍या जाणा-या जल जोडणी स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्‍या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येणार आहेत. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय होत असल्याचे आढळल्‍यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल्‍, असा स्‍पष्‍ट इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्‍या जलसंपदा विभागाच्‍या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्‍या कालावधीत करावयाच्‍या उपायोजनांबाबत सविस्‍तर परिपत्रक निर्गमित केले आहे. 

मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर (MLD) इतकी पाण्याची आवश्‍यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्‌यात घट झाली असून  उपलब्ध पाणी साठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्‍याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.

महाराष्ट्र शासन जल संपदा विभागाच्‍या निर्देशानुसार, पाण्याच्या इतर वापरावरही आवश्यक मर्यादा घालण्‍यात आल्या आहेत. त्‍यानुसार, सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येत आहेत. नवीन बांधकाम जल जोडणी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत मंजूर करण्यात येणार नाहीत. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येत आहेत. जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणी करीता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवण्‍यात येणार आहे. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्‍यात येत आहे. एरीअेटेड वॉटर व पॅकेज वॉटर बॉटलिंग प्‍लॅंटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात (Throttle) येत आहे. 

याखेरिज, सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टॅंकर / बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका, विधनविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता / परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा. मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे / RCF/ HPCL / BPCL / Navy / MIDC / BPT आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी (Operational use) कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (STP) प्रक्रियायुक्‍त पाण्याचा फेरवापर करावा, असेदेखील परिपत्रकात नमूद करण्‍यात आले आहे. 

पिण्याच्या पाण्याची बचत करण्याकामी महानगरपालिकेला सहकार्य करावे. कोणत्याही ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...