शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चांदिवली विधानसभा क्षेत्रातील भव्य छटपूजेला उत्तर भारतीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘जय छठ मैय्या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांनी भक्तिभावाने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर भारतीय नागरिकांच्या धार्मिक भावना आणि गरज लक्षात घेऊन आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने कुर्ला आणि चांदिवली परिसरात तीन ठिकाणी भव्य छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कुर्ला पश्चिम येथील शीतल तलावाशेजारी, काजूपाडा येथील शिवाजी विद्यालय मैदान तसेच संघर्षनगर, चांदिवली येथील पोलीस ठाण्याशेजारील उस्ताद लहुजी साळवे मैदान, गोदरेज हाऊसिंग सोसायटी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार दिलीप लांडे हे चांदिवली परिसरातील उत्तर भारतीय बांधवांसाठी छटपूजेचे आयोजन करत असून, यंदाही भाविकांसाठी भव्य व्यवस्था करण्यात आली होती. छटपूजेच्या पारंपरिक विधीनुसार रविवारी मावळत्या सूर्याला आणि सोमवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी हजारो महिला-पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी डीजेचा निनाद, रंगारंग भोजपुरी गीते आणि ‘जय छठ मैय्या’च्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार दिलीप लांडे यांनी छटपूजा स्थळी उपस्थित राहून भाविकांचे स्वागत केले तसेच त्यांच्यासमोर नतमस्तक होत शुभेच्छा दिल्या. हिंदू संस्कृतीतील हा पवित्र सण आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काजूपाडा येथील शिवाजी विद्यालय मैदानावर आयोजित छटपूजेदरम्यान युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उत्तर भारतीय संघ, चांदिवलीचे अध्यक्ष रामप्रसिद्ध दुबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तीन ठिकाणी झालेल्या या भव्य आयोजनामुळे चांदिवली-कुर्ला परिसरातील उत्तर भारतीय बांधवांना श्रद्धेने आणि सामूहिकरीत्या छटपूजेचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली.