अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा मुंबईसह राज्यात जाणवू लागला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याने मुंबई महानगरातील हॉटेल्स, खानावळी, खाद्य पदार्थ बनवणारे छोटे व्यावसायीक यांना त्याचा फटका बसत आहे. आताच मुंबईतील २५ टक्के हॉटेल्स गॅस अभावी बंद करावी लागली आहेत, पुढील दोन तीन दिवसात ही परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे संकट ओढवले असून सरकारने सर्वांना गॅस सिलेंडर उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, आखाती युद्धाच्या झळा आपल्याला बसू लागल्या असून केंद्र सरकारकडे या परिस्थितीला तोंड देण्यास कोणतेही धोरण नाही. सरकार तुटवडा नाही असे सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने ESMA लागू केला आहे, सर्व काही ठिक आहे तर ESMA लागू करण्याची काय गरज आहे. मुंबई महानगरात लाखो लोकांना बाहेर खावे लागते. वडापाव, समोसा, इडली वडा खाऊन अनेक लोकांना उपजिविका करावी लागते. कष्टकरी, नोकरदार मुंबईकरांना या गॅस टंचाईचे चटके बसू लागले आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून मुंबईसह राज्यात गॅस उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना कराव्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून देशातील लाखो लोकांना एटीएम व बँकांच्या रांगेत उभे केले होते. आज गॅससाठी पुन्हा देशाला रांगेत उभे केले आहे. तथाकथित विश्वगुरुचा फुगा फुटल्याचे हे लक्षण असून टाळ्या, थाळ्या वाजवून गॅस सिलेंडर मिळणार नाही. सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व पातळ्यांवर तयारी करावी व गॅस उपलब्ध करून द्यावा आणि गॅसच्या वाढवलेल्या किंमती कमी कराव्यात, गॅसचे रेशनिंग करु नये या मागण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईतील सर्व जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात १३ व १४ मार्च रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.